डोनाल्ड ट्रम्प यांची अखेर White House मधून एक्झिट !
X
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर व्हाईट हाऊसमधून एक्झिट घेतली आहे. ते फ्लोरीडाला रवाना झाले आहेत. जो बिडेन यांच्या शपथविधीला ट्रम्प उपस्थित राहणार नाहीत. त्यांनी याआधीच आपला निर्णय़ जाहीर केला होता. ट्रम्प यांचे व्हाईट हाऊस सोडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जो बिडेन हे अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काही वेळात शपथ घेणार आहेत.
ट्रम्प यांनी आपल्या अखेरच्या भाषणात बिडेन यांच्या सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच मतदारांनी ज्यासाठी मला निवडून दिले ते काम मी केले, असेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. ट्रम्प यांची सत्ता गेल्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना करण्याचा विचार सुरू केल्याचे वृत्तही काही माध्यमांनी दिले आहे. Patriot नावाचा पक्ष आपण स्थापन करणार असल्याचे त्यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना सांगितल्याची चर्चा आहे.
यामुळे रिपब्लिक पार्टीमध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान ट्रम्प यांनी घेतलेले अनेक वादग्रस्त निर्णय रद्द करण्याची घोषणा बिडेन यांनी आधीच केली आहे. ट्रम्प यांची अध्य&पदाची कारकिर्द अनेक वादांनी भरलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीचा शेवटही अत्यंत वादग्रस्त गोष्टीने झाला. अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हल्ल्यामुळे त्यांच्यावर महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मंजूर केला गेला. अध्यक्षपदाच्या एकाच कारकिर्दीमध्ये दोनवेळा महाभियोगाला सामोरे जाणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष ठरले आहेत.
फ्लोरीडाला जाताना ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला, "मला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची संधी मिळाली हा माझा सन्मान आहे, गुडबाय...पण हे गुडबाय जास्त काळासाठी नसेल"