Home > News Update > मराठा आरक्षण आंदोलनाला क्षमवण्यात अजित दादा यशस्वी ठरलेत का?

मराठा आरक्षण आंदोलनाला क्षमवण्यात अजित दादा यशस्वी ठरलेत का?

मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक होत असताना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली.

मराठा आरक्षण आंदोलनाला क्षमवण्यात अजित दादा यशस्वी ठरलेत का?
X

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ व सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह पुणे येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

यावेळी सारथी संस्थेचे अजित निंबाळकर, उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वायत्तता देण्यात येत आहे. सारथी संस्थेचे सबलिकरण व विविध उपक्रमासाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. सारथी संस्थेचे आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करण्यात येणार आहे. पहिलं उपकेंद्र कोल्हापूर येथे पुढील महिन्यापासूनच सुरु करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील शैक्षणिकदृष्टया महत्वाच्या शहरात सारथीमार्फत मराठा समाजाच्या विद्यार्थी, विद्यार्थींनीसाठी वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरु असलेल्या व्याज परतावा योजनेत प्राधान्य दिले जाईल. सारथी संस्थेने पुढील तीन वर्षाचा विभागनिहाय कृती आराखडा तयार करावा. यासाठी विभागनिहाय कार्यशाळा आयोजित कराव्यात.

सारथी संस्थेचे बंद असलेले उपक्रम व काही उपक्रम शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहेत त्यांना मान्यता घेवून उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. सारथी ही संस्था नियोजन विभागाच्या अंतर्गत असल्याने प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन भवनमध्ये सारथींच्या प्रतिनिधींसाठी जागा देण्यात येणार आहे. तारादूत प्रकल्पही सुरु करण्यात येणार आहे. शासनस्तरावर मराठा समाजाच्या तरुणांचे शैक्षणिक व नोकरीसंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. सारथी संस्थेने दिलेल्या स्वायत्तेचा लाभ घेवून आर्थिकदृष्टया गरीब मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. गरीब गरजू मराठा तरुणांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सारथी संस्थेने त्याप्रमाणे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासह सारथी संस्थेच्या स्वायत्ता व निधीसह विविध मागण्या केल्या होत्या. त्यातील बहुतांश मागण्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल खासदार संभाजीराजे यांनी समाधान व्यक्त केले.

बैठकीत काय निर्णय झाले?

सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देणार*

●सारथी संस्थेची आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करणार

●पहिले उपकेंद्र कोल्हापूर येथे सुरु होणार

●शैक्षणिकदृष्टया महत्वाच्या शहरात 'सारथी'मार्फत वसतिगृह

●तारादूत प्रकल्प सुरु करणार

●सारथीमार्फत गरजू मराठा तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार

Updated : 19 Jun 2021 11:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top