बुलडाणा जिल्ह्यात तृतीयपंथीयांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्राचे वाटप
X
बुलडाणा : भारतीय संविधानाने सर्वच समाजाला आणि समाजातील प्रत्येक घटकाला स्वतंत्र अधिकार दिले आहेत. मात्र, यातील एक घटक अजूनही आपल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहत होता,तो म्हणजे तृतीयपंथी. आता सर्व तृतीयपंथीयांना त्यांची स्वतंत्र ओळख प्रदान करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तृतीयपंथीयांना त्यांचे तृतीयपंथी असल्याचे ओळखपत्र आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आणि याच प्रमाणपत्राच्या माध्यमातून त्यांना पुढच्या काळात शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते या प्रमाणपत्र आणि ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड आदी उपस्थित होते.
तृतीयपंथीयांना असे ओळखपत्र देणारा बुलडाणा जिल्हा हा राज्यातील चौथा जिल्हा आहे, यापूर्वी सोलापूर, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष जरी झाली असली तरी मात्र, आम्हाला स्वातंत्र्य आता मिळाले असल्याच्या भावना यावेळी तृतीयपंथीयांनी व्यक्त केल्या आहेत.