Home > News Update > कल्याणमध्ये कचरा उचलण्यावरून भर रस्त्यावर वाद

कल्याणमध्ये कचरा उचलण्यावरून भर रस्त्यावर वाद

कल्याणमध्ये कचरा उचलण्यावरून भर रस्त्यावर वाद
X

कल्याण : एकीकडे कल्याण शहरात रस्त्याच्या कडेला टाकला जाणारा कचरा नियमित उचलला जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत असताना आता कचरा उचलण्यावरून दोन घंटागाडी चालकामध्ये भर चौकात वाद झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दोन प्रभागातील कचरा उचलण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला असून उर्वरित शहरातील कचरा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत उचलला जातो. मात्र अनेकदा कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी कामबंद आदोलन छेडत असल्याने व घंटागाड्या नियमित कचरा उचलत नसल्यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

पालिका प्रशासनाकडून १८४० रुपये प्रतीटन याप्रमाणे ठेकेदाराला मोबदला देत कचरा उचलण्याचा ठेका देण्यात आला आहे. त्याचबरोबर ठेकेदाराकडून देखील घंटागाड्याना परिसर ठरवून देत जितका कचरा उचलला जातो तेवढ्या कर्मचाऱ्यांची नोंद करत मोबदला दिला जातो. यामुळे जास्तीत जास्त कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी चालकाकडून जवळच्या दुसऱ्या घंटागाडीच्या भागातील कचरा उचलत आपला मोबदला वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

याच प्रयत्नात कल्याणच्या रामबाग परिसरात दुसऱ्या परिसरात कचरा उचलणाऱ्या घंटागाडीने रस्त्यावरचा कचरा उचल्याने त्या परिसरात कचरा उचलणाऱ्या घंटागाडी कर्मचारी व सुपरवायझरने त्या वाहन चालकाला चांगलेच धारेवर धरत गोंधळ घातला. तब्बल दोन तास भरचौकात हा गोंधळ सुरू होता. अखेरीस वाहन चालकाकडून भरलेला कचरा पुन्हा खाली करण्यात आल्यानंतर हा वाद संपवण्यात आला. मात्र स्वतःच्या परिसरात कचरा उचलायचा नाही व दुसऱ्या घंटागाडीने कचरा उचलला तर वाद घालायचा या प्रकरणामुळे रामबाग परिसरात कचर्‍याचे साम्राज्य पसरले असून याबाबत व्हिडिओ व्हायरल होताच पालिका प्रशासनाने माहिती घेत दोघांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

Updated : 13 Sept 2021 3:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top