पुन्हा राजकीय भूकंप होणार? नाराज शिंदे गट ठाकरेंकडे परतणार? मंत्री शंभूराज देसाईंचे सूचक वक्तव्य
X
मुंबई- शिंदे- फडणवीस सरकारला एक वर्ष होताच तिसरा साथीदार मिळाला आहे. त्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा होताना पहायला मिळत आहे. ज्या अजित पवारांवर टीका करून एकनाथ शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. त्याच अजित पवारांसाठी पायघड्या घालाव्या लागल्याने शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा सुरू आहेत. याबद्दलची आता सर्वात महत्वाची माहीती समोर येत असून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाण्याबद्दल एक सूचक विधान केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बंडखोर आमदारांनी आरोप केला होता की, राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत चालली आहे. शिवसेनेच्या मतदारसंघात राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नसल्याचाही ठपका ठेवण्यात आलेला होता. त्यानंतर आता थेट अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्ष सत्तेत भागीदार झाल्याने शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत आता शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी एक सूचक विधान केले आहे.
शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांना विचारण्यात आले की, उद्धव ठाकरेंनी जर हाक दिली व पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली तर तुम्ही मान्य करणार का? त्यावर देसाई म्हणाले की, हा जर-तरचा विषय आहे. ज्यावेळी हाक येईल तेव्हा साद दिली जाईल, असे म्हणत त्यांच्याकडून तशी साद आली तर सकारात्मक प्रतिसाद आम्ही देऊ, असे मोठे विधान केले आहे. शंभुराज देसाई यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचा तिसरा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.