Home > News Update > पत्रकारांवर पाळत, Digipub News India Foundationची सखोल चौकशीची मागणी

पत्रकारांवर पाळत, Digipub News India Foundationची सखोल चौकशीची मागणी

पत्रकारांवर पाळत, Digipub News India Foundationची सखोल चौकशीची मागणी
X

देशातील 40 पत्रकारांवर पिगॅसस (Pegasus spyware) स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवली गेल्याचे उघड झाल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर Digipub News India Foundationने तीव्र शब्दात या प्रकाराचा निषेध केला आहे. फाऊंडेशनतर्फे एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. पिगॅसस स्पायवेअर वापरुन काही पत्रकारांच्या फोनमध्ये घुसखोरी करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. केवळ अधिकृत सरकारांनी दिलेल्या फोन नंबरमध्ये आम्ही हेरगिरी करतो असे सांगणाऱ्या NSO कंपनीच्या स्पायवेअरचा वापर हेरगिरी कऱण्यासाठी का केला गेला, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

अशाप्रकारे माध्यमांमधील लोकांवर पाळत ठेवणे हा कायद्याचा आणि त्या लोकांच्या खासगीपणाच्या हक्काचा भंग आहे. शिवाय अशाप्रकारांमुळे जनतेत आणि माध्यमांमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याचीही भीती आहे. एवढेच नाही तर अशाप्रकारे काही बिग ब्रदर्सच्या सांगण्यावरुन पत्रकारांवर पाळत ठेवली गेली तर पत्रकार आपले काम निर्भयपणे कसे करुन शकतील? यामुळे लोकशाही केवळ नावापुरती आहे का, असा प्रश्न निर्माण होतो, अशी टीकाही या पत्रकातून करण्यात आली आहे. भारतासारख्या लोकशाही मुल्य पाळणाऱ्या देशात अशाप्रकारे पाळत ठेवली जाणे हे केवळ वृत्त माध्यमांसाठीच नाही तर देशाच्या प्रगतीला सुद्धा मारक ठरू शकते, असेही संघटनेने म्हटले आहे.

या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, तसेच आपल्यावर पाळत का ठेवली गेली आणि कुणी ही पाळत ठेवली, हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी करत आहोत, असेही या पत्रकात संघटनेने म्हटले आहे.

Updated : 19 July 2021 3:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top