महाराष्ट्र भाजपचा बुरखा परराष्ट्र मंत्रालयाने फाडला
भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशियाने सहा तास युध्द थांबवत असल्याचे म्हटल्याचा दावा केला जात होता. मात्र त्यामागचे सत्य काय आहे?
X
रशिया युक्रेन संघर्षाचे युध्दात रुपांतर होऊन आठ दिवस उलटले आहेत. या युध्दात दोन्ही देशांकडून एकमेकांना प्रत्युत्तर दिले जात आहे. तर रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर मिसाईल हल्ले केले आहेत. त्यापार्श्वभुमीवर अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. मात्र पंतप्रधान मोदी यांच्याशी पुतीन यांनी केलेल्या चर्चेनंतर भारतीयांना सुखरुप युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी सहा तास युध्द थांबवत असल्याची घोषणा केली असल्याचा दावा भाजप महाराष्ट्रने केला होता. मात्र या वृत्ताचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने खंडण केले आहे.
हा नवीन भारत आहे!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 3, 2022
युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी 6 तास रशियाने युद्ध थांबवलं.
पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांच्याशी बोलल्यावर हे शक्य झालं.
रशियन एअरफोर्स विमान व सैनिकी वाहनाने बाहेर काढण्याचं जाहीर केलं. pic.twitter.com/rf3i0Ad8k7
रशिया युक्रेन युध्दाची तीव्रता वाढत चालली असून त्याचा फटका संपुर्ण जगाला बसत आहे. त्यातच रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर मिसाईल हल्ले सुरु केले आहेत. त्यातच राजधानी कीव आणि युक्रेनमधील दुसरे मोठे शहर खारकीव्ह यांच्यावर बाँबवर्षावर केला जात आहे. त्यामध्ये अनेक नागरीकांचा मृत्यू होत आहे. तर रशियाने खारकीव्हमध्ये केलेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भारत सरकारने भारतीयांना तातडीने खारकीव्ह सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर रशिया भारतीयांना सुरक्षित खारकीव्ह बाहेर सोडण्यासाठी सहा तास युध्द थांबवत असल्याची घोषणा केल्याचा दावा महाराष्ट्र भाजपने केला आहे. पण या दाव्यातील सत्यता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, युध्द आमच्या सांगण्यावरुन थांबेल असे म्हणने म्हणजे आमच्या सांगण्यावरुन बाँबफेक होण्यासारखे आहे. त्यामुळे मी या वृत्तावर भाष्य करू शकत नाही, अशा शब्दात अरिंदम बागची यांनी विषयाला बगल देत वृत्ताचे खंडण केले.
पुढे बागची म्हणाले, खार्कीव्ह आणि सुमी येथून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही युक्रेन आणि रशियाच्या संपर्कात आहोत. त्यामुळे भारतीयांना बाहेर काढण्यासाठीच्या कामाला वेग येईल, असे अरिंदम बागची यांनी सांगितले.
भारत सरकारने सुरु केलेल्या ऑपरेशन गंगा अंतर्गत 18 हजार भारतीयांपैकी 6 हजार 400 भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे, अशी माहिती परराषट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.