देवेंद्र फडणवीस आज दुपारी पत्रकार परिषद घेणार ; दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा दिला होता इशारा
X
मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला आता नवं वळण मिळालं असून याप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या आहेत. तसेच राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांनी NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) एकापाठोपाठ एक आरोप केले. हे आरोपांचे सत्र आता थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचले आहे.
अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणाचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असल्याचा खळबळजनक आरोप केला. याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी सर्व आरोपांचं खंडन केलं होतं. तसेच, दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावला, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार आज दुपारी 12 वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर नवाब मलिकही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही पत्रकार परिषदेत फडणवीस- मलिक काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.