फडणवीसांचा अनोखा उपक्रम, अर्थसंकल्पाविषयी लोकांकडून मागितला फीडबॅक
X
अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च २०२३ रोजी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. हा अर्थसंकल्प सादर कऱण्याआधी त्यांनी लोकांकडून बजेटविषयी सूचना मागविल्या होत्या. त्यानंतरच तो अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. आता चार महिन्यानंतर या बजेटविषयी लोकांना काय वाटतं, याविषयी प्रतिसाद कळवावा, असं आवाहन फडणवीस यांनी लोकांना केलंय.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच बजेट सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी लोकांकडून सूचना मागविल्या होत्या. त्यामुळं अशा बजेटविषयी सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. या बजेटमुळं लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला हे जाणून घेण्यासाठी आता फडणवीसांनी अनोखा उपक्रम सुरू केलाय. फडणवीसांनी १० जुलै रोजी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी लोकांना या बजेटविषयी प्रतिक्रिया कळविण्याचं आवाहन केलंय. फडणवीसांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिलीय. त्यात ते म्हणाले, 'अमृतकाला'तील 'महाबजेट 2023' मधल्या जनकल्याणकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत ना? तुमचे अनुभव माझ्या सोबत सोशल मीडियातील विविध प्लॅटफॉर्म मार्फत जरूर शेयर करा. मी वाट पाहतोय...असं आवाहन त्यांनी केलंय. फडणवीसांच्या या आवाहनाला फेसबुक, ट्विटरवरसह इतर सोशल मीडियावर लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यायला सुरूवात केलीय.