परमबीर पत्र प्रकरणी कोण खरे कोण खोटे?
X
परम बीर सिंग यांच्या पत्र प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शरद पवार यांनी क्लीन चिट दिली आहे. परम बीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे आहेत, त्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. परम बीर सिंग यांनी पत्रात ज्या तारखांचा उल्लेख आहे, त्या तारखांना अनिल देशमुख हे कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये एडमिट होते. तसेच त्यानंतरही ते होम क्वारंटाईन होते, त्यामुळे परम बीर सिंग यांच्या पत्रातील आरोप खोटे सिद्ध आहे, हे सिद्ध होते असेही पवारांनी स्पष्ट केले आहे.
पण आता शरद पवार यांनी परम बीर सिंगांच्या पत्रातील ताऱखा आणि गृहमंत्र्यांचे तेव्हाचे वेळापत्रक यातील फरक समोर आणल्यानंतर नवीन वाद सुरू झाला आहे. त्यामुळे कोण खरे बोलते आहे आणि कोण खोटे असा प्रश्न आता निर्माण झाला हे.
शरद पवारांचा दावा
माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी पत्रात फेब्रुवारीच्या मध्याचा उल्लेख केला आहे. या कालावधीत सचिन वाझेंना गृहमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी परमबीर सिंग यांना दिल्याचे सिंग यांचे म्हणणे आहे. पण ६ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख कोरोनामुळे एडमिट होते. तसेच त्यानंतरही ते होमक्वारंटाईन असल्याने कुणाला भेटण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे सिंग याचे आरोप खोटे सिद्ध होतात.
पवारांच्या दाव्याला देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप
पण शरद पवार यांची ही पत्रकार परिषद सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांची १५ तारखेची एक ट्विटर पोस्ट शेअर केली. तसेच काही सवाल उपस्थित केले आहेत. "15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?" भाजपच्या या ट्विटनंतर पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारले. तेव्हा माझ्याकडे अनिल देशमुख यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्याची त्या तारखेची कागदपत्रं आहेत असे स्पष्टीकरण शऱद पवार यांनी दिले.