देवेंद्र फडणवीस शरद पवार भेट कशासाठी, नवाब मलिक म्हणाले...
X
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे. या भेटीनंतर या भेटीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. या संदर्भात आता राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं असून फडणवीस यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट ही फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घेतल्याचं म्हटलं आहे.
शरद पवार यांची शस्त्रक्रिया झाल्यावर ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेत होते. या कालावधीत अनेक लोकांनी तब्येतीची घरी येऊन विचारपूस केली होती. त्याच दृष्टीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट घेतली दुसरं काही नाही
महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दुश्मनासारखे काम करत नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इथे व्यक्तीगत नाती टिकवली जातात शिवाय व्यक्तीगत गाठीभेटी या होत असतात. परंतु या भेटी राजकीय कारणासाठी होतात असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
मात्र, या भेटीनंतर आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची शरद पवार भेट घेणार असल्यानं फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीत नक्की काय घडलं? या चर्चेला अधिक जोर आला आहे.