Home > News Update > दिल्लीत पत्रकारांच्या घरी धाडी, लॅपटॉप, फोन घेतले ताब्यात

दिल्लीत पत्रकारांच्या घरी धाडी, लॅपटॉप, फोन घेतले ताब्यात

दिल्लीत पत्रकारांच्या घरी धाडी, लॅपटॉप, फोन घेतले ताब्यात
X

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सकाळीच अनेक पत्रकारांच्या घरी धाडी टाकल्याचे समोर आले आहे. मात्र पत्रकारांच्या घरी धाडी टाकणे हिच लोकशाही आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सकाळीच न्यूज क्लिकशी संबंधित असलेल्या काही पत्रकारांच्या घरी धाडी मारत फोन आणि लॅपटॉप ताब्यात घेतले आहेत.

न्यूज क्लिकशी संबंधित असलेल्या अभिसार शर्मा, व्यंगचित्रकार संजय राजौरा, भाषा सिंह, उर्मिलेष, प्रबीर पुरकायस्थ, प्रनोंजय ठाकुरता, औनिंद्यो चक्रवर्ती आणि सोहेल हाशमी यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या. त्यामध्ये या पत्रकारांचे मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

अभिसार शर्मा यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, दिल्ली पोलिस माझ्या घरी दाखल झाली. त्यानंतर ते माझा फोन आणि लॅपटॉप घेऊन गेले.

दिल्ली पोलिसांनी मारलेल्या धाडीनंतर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्वीट करून हिच लोकशाही आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

राजदीप सरदेसाई यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीतील पत्रकार आणि लेखकांच्या घरी धाडी मारल्या आहेत आणि त्यांचे फोन आणि लॅपटॉप ताब्यात घेतले आहेत. कोणत्याही वॉरंट किंवा एफआयआरशिवाय तपास सुरू आहे. लोकशाहीत पत्रकार संघराज्याचे शत्रू आहेत का? असा सवाल राजदीप सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.

प्रकरण नेमकं काय?

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी न्यूज क्लिक या पोर्टलच्या माध्यमातून देशविरोधी अभियान चालविण्यासाठी चीनचे फंडिंग करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणी न्यूज क्लिकचे प्रधान संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्याशी संबंधित दिल्लीतील फ्लॅट जप्त केले होते.

त्यापुर्वीच 2021 मध्ये दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यूज क्लिकच्या फंडिंगवरून गुन्हा दाखल केला होता. तर संशयास्पदरित्या चीनी फंडिंग न्यूज क्लिकला मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी ईडीने ऑगस्टमध्ये कारवाई केली होती. मात्र उच्च न्यायालयाने न्यूज क्लिकच्या प्रोमोटर्सना अटकेपासून संरक्षण दिले होते. हे सगळं झालं असतानाच कोणत्याही प्रकारे वॉरंट किंवा एफआयआर नसताना दिल्ली पोलिसांनी पत्रकार आणि लेखकांच्या घरी धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे पत्रकारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मात्र न्यूज क्लिकची UAPA अंतर्गत चौकशी सुरू असून अद्याप FIR दाखल नसल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Updated : 3 Oct 2023 12:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top