देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 30 ऑक्टोबरला होणार मतदान
X
नांदेड : देगलूर विधानसभेचे आमदार काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे सहा महिन्यापुर्वी कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशभरातील रिक्त असलेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका विधानसभेच्या जागेचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेचा यामध्ये समावेश असून देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या पोटनिवडणूकीत दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर हे काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत मात्र, महाआघाडीमुळे साबणेंची अडचण झाली आहे. तर काँग्रेस कडून माजी अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, मंगेश कदम, भिमराव क्षिरसागर हे तर भाजपाकडून मारोती वाडेकर, धोंडीबा कांबळे हे इच्छुक आहेत. तर वंचित कडून डॉ. उत्तम इंगोले निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.