मराठवाड्यात दिग्गजांचा पराभव; नव्या चेहऱ्यांना संधी
Max Maharashtra | 24 Oct 2019 9:56 PM IST
X
X
मराठवाडा हा शिवसेना भाजपसाठी कायम अनुकूल आहे असं मानलं जातं. मात्र आज मराठवाड्यात अनेक धक्कादायक निकाल लागले. राज्याच्या राजकारणात मोठी प्रतिष्ठा असलेल्या अनेक नेत्यांना आज पराभवाला सामोरं जावं लागलं. यासोबतच अनेक नव्या चेहऱ्यांनाही मराठवाड्याच्या भूमीने संधी दिली आहे. यामुळे मराठवाड्याच्या राजकारणातली अनेक समीकरणं बदलली आहेत.
पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव आणि धनंजय मुंडे यांचा विजय
परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव हा या विधानसभा निवडणुकीतला सर्वात धक्कादायक निकाल म्हणावा लागेल. पंकजा १० वर्षांपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा या परळीमध्ये पंकजा यांनी आपलं स्थान तयार केलं होतं. त्याला पंकजा यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं होतं.
बहिण-भावाची ही जोडी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही आमनेसामने आली होती. त्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांचे नुकतंच निधन झालं होतं. त्यामुळे मुंडे यांच्या पश्चात तयार झालेल्या सहानुभूतीचा पंकजा यांना फायदा झाला आणि त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर त्यांना राज्यात कॅबिनेट मंत्रीपद मिळालं.
धनंजय मुंडे यांचा पराभव झाला असला तरी राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर घेत विरोधी पक्षनेतेपद दिलं. त्यामुळे परळीत दोन सत्ताकेंद्र तयार झाले. त्यानंतर भगवानगडाचा वाद असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, हे दोन भाऊ बहीण अनेकदा आमनेसामने आले. मात्र, यंदाच्या विधानसभेत परिवर्तन करायचंच असा चंग धनंजय मुंडे यांनी बांधला होता. त्यांनी मतदारसंघात चांगला जनसंपर्क तयार केला. पंकजा मुंडे ज्या गोष्टीत कमी पडत आहेत त्याचा अभ्यास करून त्या गोष्टींना आपलं बलस्थान बनवलं. अखेरच्या टप्प्यात झालेल्या भावनिक प्रचारातही त्यांनी आपलं स्थान टिकवून ठेवलं. त्यामुळे त्यांचा विजय झाला.
पुतण्याने काकांना दिला धोबीपछाड
बीडमध्ये लागलेला आणखी एक निकाल भुवया उंचावणारा ठरला. बीड मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागर यांनी सेनेचे उमेदवार असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला. राज्यात कायम चर्चेत असलेल्या काका-पुतण्याच्या संघर्षाच्या राजकारणात क्षीरसागर घराण्याने भर टाकली होती. आणि या संघर्षात पुतण्याची सरशी झाली.
जयदत्त यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला होता. तेव्हाच बीडमध्ये काका-पुतण्या संघर्ष रंगेल असं बोललं जात होतं. २०१४ ला मोदीलाटेत बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून निवडून आलेले ते एकमेव आमदार होते. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणचं कारण देत त्यांनी शिवबंधन बांधलं. त्यांना लगेचच राज्यात झालेल्या शेवटच्या मंत्रीमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं.
मतमोजणीच्या सुरुवातीपासून या दोन उमेदवारांमध्ये चुसार पाहायला मिळत होती. ती शेवटच्या फेरीपर्यंत टिकली. पण तरीही अखेर राष्ट्रवादीचं संघटन, तरुणांची फौज आणि पध्दतशीरपणे केलेला प्रचार यामुळे संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला.
मंत्री अर्जुन खोतकर यांना पराभवाचा झटका
मराठवाड्यात आणखी एक आश्चर्यकारक लागलेला निकाल म्हणजे जालन्याचा. जालन्याचे आमदार आणि शिवसेनेने राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी पराभवाची धूळ चारली.
गोरंट्याल आणि खोतकर हा पारंपरिक संघर्ष जालना जिल्ह्याला माहीत आहे. मात्र या विधानसभा निवडणुकीत गोरंट्याल हे खोतकरांना भारी पडले. खोतकरांच्या पराभवामागे केंद्रीय मंत्री आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचा हात असल्याच्या चर्चा सध्या जालन्यात आहेत.
प्रतिष्ठेच्या लढतीत अभिमन्यू पवार यांचा विजय
अत्यंत प्रतिष्ठेची झालेली ललातूरच्या औशाची लढत भाजपने जिंकली आहे. लातूर जिल्ह्यातील औसामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक भाजपकडून रिंगणात होते. त्यांचा सुमारे २७ हजारांनी विजय झाला आहे.
पवार यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेच्या ताब्यातील हा मतदारसंघ भाजपने स्वतःकडे घेतला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे बसवराज पाटील हे सलग दोन वेळा औसा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडून आले होते. त्यांची विजयाची हॅट्ट्रिक भाजपच्या नवख्या अभिमन्यू पवार यांच्यामुळे हुकली. पवार यांच्या उमेदवारीनंतर तयार झालेल्या बंडखोरीला ते पुरून उरले.
मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या मतदारसंघात अभिमन्यू पवारांच्या विजयामुळे एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.
धीरज देशमुख यांचा विक्रमी विजय
लातूर ग्रामीण मतदारसंघातून दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांचा विजय झाला आहे. धीरज यांनी तब्बल १ लाख १९ हजार मतांनी शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांचा पराभव केला.
२०१४ मध्ये मोदीलाटेतही अमित देशमुख निवडून आले होते. तेव्हा लातूर शहरसोबत लातूर ग्रामीणमधून उमेदवारी मिळावी यासाठी देशमुख कुटुंबाचे प्रयत्न सुरू होते. मात्र धीरज यांच्याऐवजी त्र्यंबक भिसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर धीरज यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागात आपला जनसंपर्क तयार केला. आणि यंदाच्या निवडणुकांना सामोरे गेले.
निवडणूक प्रचारात विलासराव यांच्या पत्नी वैशाली देशमुख, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख यांनी जोरदार प्रचार केला होता. ज्याचा फायदा धीरज यांना निवडणुकीत झाला.
Updated : 24 Oct 2019 9:56 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire