खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल
X
नवी दिल्ली// शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी काल मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. खासदार राऊत यांनी दोन खासगी वृत्तवाहिन्यावर दिलेल्या मुलाखतींत भाजप कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज यांनी मंडवली पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दिली होती, या मुलाखतीचा व्हिडिओही पोलिसांना सादर करण्यात आला होता.
दरम्यान तपासानंतर पोलिसांनी भादंविच्या 509 आणि 500 म्हणजेच अश्लील शब्दांचा वापर आणि बदनामी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी खासदार राऊत यांच्यावर विनयभंगाचे कलम लावावे, अशी विनंती भारद्वाज यांनी पोलिसांकडे केली आहे.
दीप्ती रावत या भारद्वाज आयपी एक्स्टेंशनमध्ये राहतात. रावत यांनी पोलिसांना सांगितले की, गुरुवारी त्या एक खासगी मराठी वाहिनी पाहत होत्या. संजय राऊत यांची मुलाखत त्यावर येत होती, त्यांच्या मुलाखतीत ते भाजप कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत होते. त्या वक्तव्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत, या प्रकरणी त्यांनी खासदार राऊत यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे समजते.