Deepali Chavan suicide case: एम. एस. रेड्डीचं निलंबन: यशोमती ठाकूर
Deepali Chavan Case: CCF Reddy चं अखेर निलंबन
X
वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात अपर प्रधान उप वनसंरक्षक क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांचं आज अखेर निलंबन करण्यात आले आहे. या संदर्भात राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीतनंतर माध्यमांशी बोलताना यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री या संदर्भात कडक निर्देश देणारं असल्याचं सांगितलं. वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्याबरोबरच अपर प्रधान उप वनसंरक्षकाचं देखील नाव आहे.
त्यामुळे अपर प्रधान उपवन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना देखील या प्रकरणात उपवनसंरक्षक शिवकुमार प्रमाणे सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे त्यानंतर आज यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तातडीने भेट घेतली. या भेटीनंतर यशोमती ठाकूर यांनी सरकार या प्रकरणी ठोस कारवाई करत असल्याचं सांगत विरोधकांनी राजकारण करू नये. असं म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंजच्या RFO दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून RFO (वनपरिक्षेत्र अधिकारी) या पदावर कार्यरत होत्या. गुरूवारी संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. दिपाली यांनी मेळघाट वनक्षेत्राचे संचालक रेड्डी यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. आपण गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहोत, असे त्यांनी या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकऱ्यांसमोर आणि कर्मचाऱ्यांसमोर अश्लील शिविगाळ करतात, रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलावतात, आपल्याशी अश्लील वर्तन करतात असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.
त्याचबरोबर आपण गर्भवती असल्याने ट्रेकला येऊ शकत नसल्याचे सांगूनही शिवकुमार यांनी आपल्याला 3 दिवस कच्च्या रस्त्यांवरुन फिरवले. यामुळे आपला गर्भपातही झाला, असा आरोप त्यांनी केला आहे. शिवकुमार हे जाणूनबुजून आपला छळ करत आहेत. वारंवार वरिष्ठांकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे अखेर नैराश्यातून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. आपल्या मृत्यूनंतरचे सर्व लाभ आईला देण्यात यावेही असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.