बुलडाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा मृत्यू ; कुटुंबियांकडून पोलिसांवर गंभीर आरोप
X
बुलडाणा येथील बुलडाणा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा काल सायंकाळी मृत्यू झाला. 53 वर्षीय राजेंद्र डांगे असे मृत्यू झालेल्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचे नाव आहे मृतक हे नांदुरा येथील माजी नगरसेवक होते. त्यांच्या मृत्यूनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात भाजप कार्यकर्ते जमा झाले होते. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.दरम्यान त्यांच्यासोबत बुलडाणा कारागृहच्या दुर्लक्षलामुळे डांगे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
राजेंद्र डांगे यांच्यावर नांदुरा पोलिस ठाण्यात जुलै महिन्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. 31 जुलैपासून ते जिल्हा कारागृहात होते. आज सायंकाळी त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने सुरक्षा रक्षकांनी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांची गर्दी पाहता जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. डांगे यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले असल्याचे नातेवाईक सांगत होते. तब्येत खराब असूनही त्यांच्यावर वेळेत उपचार केले नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे डांगे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नी आणि मुलीने केला आहे. खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवू देणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.