राज्य सरकारी कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नोव्हेंबरपासून ११ टक्क्यांनी वाढ
X
राज्य सरकारी कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा आणखी गोड होणार आहे. सातवा वेतन आयोग लागू असलेल्या राज्य सरकारीकर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२१ पासून ही वाढ लागू केली जाणार आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना कमीत कमी २,२२० तर जास्तीत जास्त ७,१०० रुपये सरासरी वाढ मिळेल अशी माहिती देण्यात आली आहे. तर केंद्र सरकारने १ जुलै २०२१ पासून महागाई भत्ता हा १७ टक्क्यांवरून २८ टक्के केला होता. दरम्यान जुलै ते सप्टेंबर २०२१ ची थकबाकी देण्यासंदर्भात वेगळा आदेश काढला जाणार आहे. या वाढीमध्ये १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० व १ जानेवारी २०२१ पासूनच्या महागाई भत्त्याचाही समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा जवळपास १७ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे तर साडेसहा लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनादेखील याचा लाभ मिळणार आहे.दरम्यान राज्य शासनाच्या या निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.