दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त,नांदेडमध्ये उद्यापासून ब्लू प्राईड कार्निव्हल
X
आंबेडकरी चळवळीची अस्मिता असलेल्या दलित पॅंथर या संघटनेला पन्नास वर्ष होत असल्याने दलित पॅंथर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अस्मितेचा जागर ब्लू प्राईड कार्निव्हल २०२२ चे दिनांक २८ व २९ मे रोजी शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे आयोजन करण्यात आले असून या निमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने राहुल प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली .
औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे या मागणीसाठी, शिवाय दलित- आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध लढा देण्यासाठी स्थापन झालेल्या आणि आंबेडकरी चळवळीची अस्मिता राहिलेल्या दलित पॅंथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला सुरुवात झाली आहे .या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने दलित पँथरच्या अस्मिता जागी करण्यासाठी हा क्रांतिकारी जाज्वल्य इतिहास नव्या पिढीला प्रेरणादायी ठरावा, यासाठी नांदेड मध्ये दिनांक २८ व २९ मे रोजी अस्मितेचा जागर ब्लू प्राईड २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे .
दिनांक २८ मे रोजी सकाळी दहा वाजता पहिल्या सत्रात अभिवादन आणि उद्घाटन समारंभ पार पडणार आहे .याच वेळी जात्यावरील भीम गीते आयोजित करण्यात आली आहेत. दुसऱ्या सत्रात सकाळी पावणे अकरा ते दुपारी सव्वा एक या वेळेत अमेरिकेतील ब्लॅक पॅंथर संघटनेचे हॅन्ड्री गॅडिस , मायकेल मॅककार्टी,जाकोबी विलीयन्स , सिडनी पॅटरसन, ज वि पवार , सुरज इंगळे, प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे, भारती प्रभू, हर्षदीप कांबळे यांची व्याख्याने होणार आहेत तर तिसऱ्या सत्रात दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत राहुल जोंधळे दिग्दर्शित निळी टोपी या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. चौथ्या सत्रात पॅनल चर्चेमध्ये अमेरिकेतील हॅन्ड्री गॅडिस , मायकेल मॅककार्टी, सिडनी पॅटरसन, ज. वि. पवार यांचे चर्चासत्र होईल तर पाचव्या सत्रात लोकनाथ यशवंत, नागराज मंजुळे, प्रकाश मोगले, नितीन चंदनशिवे यांचे कविता वाचन होणार आहे.
सहाव्या सत्रात सायंकाळी राहुल सोनपिंपळे, गौरव सोमवंशी ,सारंग पुणेकर हे चर्चासत्रात भाग घेतील तर सातव्या सत्रात रात्री आठ वाजता रॅपर माही , स्वदेशी रॅपर, रॅपर वाजिद यांचे रॅपर सिंगिन आयोजित करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक २९ मे रोजी सकाळी दहा वाजता पहिल्या सत्रात लघुचित्रपट दाखविला जाणार आहे. दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे ,प्रशांत कनोजिया, शरद तांदळे ,इंदिरा आठवले यांचा परिसंवाद होईल. तिसऱ्या सत्रात रावबा गजमल दिग्दर्शिका स्मशानातील सोने या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे .चौथ्या सत्रात भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांचे भाषण होईल. पाचव्या सत्रात सायंकाळी सव्वा चार वाजता राहुल जोंधळे दिग्दर्शिका सॉरी पॅंथर हे नाटक आयोजित करण्यात आले आहे.
सहाव्या सत्रात प्रशांत रोकडे, प्रवीण चव्हाण, साहेबराव सदावर्ते चर्चासत्र , सातव्या सत्रात चरण जाधव, सचिन डांगळे, सागर काकडे, अतुल खरात यांची कविता वाचन तर रात्री साडेआठ वाजता आठव्या सत्रात शास्त्रीय संगीत व रॅपर संगीत आयोजित करण्यात आले असून यात संजय मोहड,रॅपर विपिन ,रॅपर रॉक्सन आपले सादरीकरण करतील अशी माहिती राहुल प्रधान यांनी दिली आहे. दोन दिवस चालणाऱ्या दलित पॅंथर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ब्लू प्राईड कार्निव्हल २०२२ या कार्यक्रमात हजारो अभ्यासक व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.