मुंबईत कोविड स्फोट ?: मुंबईत २४ तासांत करोनाचे ७६३ पॉझिटिव्ह
करोना संसर्ग कमी होऊन सुरळीत झालेले जगजीवन पुन्हा प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली असून मुंबईमध्ये 24 तासात 753 नवो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आयआयटी मुंबईमध्ये एकाच वेळी 30 जण पॉझिटिव्ह झाल्याने खळबळ उडाली आहे.
X
सलग दोन वर्षाचा कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे परत एकदा करोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण कोणीही घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी मुंबई शहरात करोनाचे ७६३ नवे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. पण यावर कोणीही घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सतत वाढत असलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांनी ज्या इमारतींमध्ये संसर्गाची प्रकरणे आढळली आहेत तिथ मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड -१९ चाचण्यांची संख्या सध्याच्या आठ हजार चाचण्यांवरून ३०,००० पेक्षा जास्त करावी. सध्या संसर्गाचे प्रमाण आठ टक्क्यांवर पोहोचले आहे. जो धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे पालिका अलर्टमोडवर आहे. अशात नागरिकांनीही आपली काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
जुलैमध्ये कोविड-९ ची चौथी लाट येईल अशा चर्चा होत आहेत. पण नागरिकांनीच स्वत:ची काळजी घेतली, मास्कचा वापर केला, सुरक्षित अंतर ठेवलं तर यामुळे कोणताही धोका होणार नाही आणि लॉकडाऊनही लागणार नाही. पावसाळा सुरू झाल्याने चौथी लाट आणि जलजन्य आजारांची शक्यता लक्षात घेऊन संबंधित कार्यालये आणि विभागांना सज्ज राहण्यास सांगितले आहे, अशी माहितीही बीएमसीकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत आयआयटी मुंबईमध्ये किमान तीस जणांना करोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं. या सर्वांमध्ये सौम्य लक्षणं असून त्यांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं आहे. सध्या संस्थेने कॅम्पसमधील कोणतेही केंद्र किंवा उपक्रम बंद केलेले नाहीत आणि व्यवस्थापन सर्व खबरदारीच्या उपाययोजना करत आहे.
महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांमध्ये करोना रुग्ण वाढत असल्याने नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने याआधीच सर्वसामान्यांना कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे, अन्यथा त्यांना पुन्हा निर्बंधांना सामोरे जावे लागेल. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना पत्र लिहून यासंबंधी लक्ष वेधलं.
आपल्या पत्रात त्यांनी रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरित पावले उचलण्यास सांगितले आहे. पत्रात त्यांनी चौथी लाट येण्यापासून रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. वाढत्या कोविड संसर्गामुळे पुन्हा एकदा निर्बंध लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.