कोविड काळात जीवावर उदार झालेल्यांना राज्य मंत्रिमंडळाचा दिलासा...
X
जागतिक महामारी कोविडच्या संकटात स्वतःच्या जीवावर उदार होऊन कंत्राटी वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना राज्य मंत्रीमंडळाने दिला आहे. धोरण निश्चित करुन कंत्राटी आरोग्य सेवकांना सेवेत समावून घेतले जाणार आहेत.
कोविड काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांसाठी हा राज्य मंत्रिमंडळाचा मोठा दिलासा ठरला असून नोकरीसाठी लाभ मिळावा म्हणून गुणांकन कार्य पद्धती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे. गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे.
यामध्ये वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. कोविड काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे. सार्वजनिक आरोग्यमधील भरतीच्या वेळी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. अशी कार्यपद्धती लवकरात लवकर निश्चित करावी जेणे करून भरतीच्या वेळी अशा कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ व्हावा तसेच सध्याच्या भरतीच्या पात्रतेच्या अधीन राहून ही कार्यपद्धती असावी असेही ठरले आहे. सर्व कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेणार का? सर्व शासकीय लाभ कंत्राटी आरोग्य सेवकांना मिळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शासनाचे धोरण निश्चित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
मॅक्स महाराष्ट्राने देखील यासंबधात वेळोवेळी आवाज उठवला होता.
गरज सरो वैद्य मरो... : कोविड काळातील कंत्राटी आरोग्यसेवकांची वेतनाअभावी परवड