करोनाची लस मोफत मिळणार ; केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन
X
वर्षभर कोरोना महामारीनं ग्रासलेल्या भारतीयांना नववर्षाच्या सुरूवातीलाच दिलासादायक बातम्या मिळत आहे.काल सीरमच्या कोरोना लसीला मान्यता दिल्यानंतर आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे. देशभरात ड्राय रन केलं जात आहे.
प्रत्येक राज्यात ठराविक शहरांमध्ये ड्राय रन केलं जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून ड्राय रनचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. करोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे? असा प्रश्न हर्ष वर्धन यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले,"फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोना लस मोफत दिली जाणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटच 'कोव्हिशिल्ड'चं उत्पादन करत आहे. सीरममध्ये 'कोव्हिशिल्ड'चे कोट्यवधी डोस तयार होणार आहे. सीरमचे सीईओ अदर पुनावालांच्या म्हणण्यानुसार, ही लस सरकारला 200 ते 250 रुपयांपर्यंत मिळू शकते, तर खासगी विक्रेत्यांना ही लस 500 ते 600 रुपयांपर्यंत मिळू शकते. मात्र, तुम्हाला ही लस घेण्यासाठी खिशातील एकही रुपया खर्च करण्याची गरज भासण्याची शक्यता कमी आहे. कारण, कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत सरकारकडून प्रत्येकाला ही लस मोफत दिली जाणार आहे.
'कोविशिल्ड' बाबत भारतासाठी चांगली गोष्ट ही की, या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये होत आहे. सीरम इन्स्टिट्युट ही लस बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीची लस निर्मिती क्षमता अफाट आहे. आतापर्यंत सीरममध्ये तब्बल 5 कोटी कोविशिल्ड तयार झाल्याची माहिती आहे. तर जुलै 2021 पर्यंत सीरमनं तब्बल 30 कोटी डोस तयार करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विकसनशील देशांना लस पुरवण्यासाठी सीरमनं ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपनीबरोबर करार केला आहे.
जगभरात एवढ्या लसी तयार झाल्या आहेत, त्यांच्यापैकी अनेक लसी तिसऱ्या टप्प्यातही यशस्वी ठरल्या आहे, मग कोविशिल्डला मान्यता देण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. कोविशिल्ड या लसीचं उत्पादन पुण्यात होत आहे, त्यामुळं भारतात तिची वाहतूक सहज शक्य आहे, त्यामुळं वाहतुकीचा खर्च वाचणार आहे. शिवाय कोविशिल्डला अतिथंड तापमानाची गरज लागत नाही. इतर लसींची उणे 40 ते 50 अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानात साठवण करावी लागते, आपल्याकडे प्रत्येक भागात ही क्षमता अजूनतरी नाही. मात्र, त्याचवेळी कोविशिल्ड ही लस सहज साठवता येऊ शकते. आणि कोविशिल्ड ही लस निवडण्याचं तिसरं कारण आहे किंमत, या लसीची किंमत अतिशय कमी आहे. अवघ्या 500 ते 600 रुपयांना ही लस मिळणार आहे. जगातील इतर लसींशी तुलना केली तर ही किंमत नाममात्र आहे. त्यामुळंच कोविशिल्डला सरकार प्राधान्य देण्याच्या विचारात आहे.