Home > News Update > १५ हजार कोटींचे ड्रग्ज प्रकरण, अदानी पोर्ट व्यवस्थापनाच्या चौकशीचे आदेश

१५ हजार कोटींचे ड्रग्ज प्रकरण, अदानी पोर्ट व्यवस्थापनाच्या चौकशीचे आदेश

१५ हजार कोटींचे ड्रग्ज प्रकरण, अदानी पोर्ट व्यवस्थापनाच्या चौकशीचे आदेश
X

गुजरातमधील मुंद्रा अदानी पोर्टमध्ये (Mundra Adani Port) सापडलेल्या ३ हजार किलो ड्रग्जप्रकरणी(drugs) आता अदानी समुहाला (Adani Group) मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील ड्रग्जविरोधी विशेष कोर्टाने या प्रकरणात मुंद्रा अदानी पोर्ट, त्यांचे व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी यांना काही मोबदला मिळाला होता का, याची चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने महसूल गुप्तचर यंत्रणेला दिले आहेत. यासंदर्भताले वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. कोर्टाच्या आदेशाची प्रत इंडियन एक्सप्रेसला मिळाली असल्याचे या वृत्तांत सांगण्यात आले आहे.

आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग कंपनीच्या नावाने इराणमार्गे अफगाणिस्तानातून दोन कंटेनवर आले होते. या कंटेनरमध्ये २ हजार ९९० किलो हेरॉईन होते, जे मुंद्रा अदानी पोर्टमध्ये जप्त करण्यात आले आहे. १६ सप्टेंबर रोजी DRI अर्थात महसूल गुप्तचर यंत्रणेने ही कारवाई केली आहे. यासंदर्भात मुंद्रा अदानी पोर्टच्या सीईओंना प्रतिक्रियेसाठी मेल केला होता, पण त्यांचे उत्तर आले नाही, अशी माहितीही या वृत्तामध्ये देण्यात आली आहे.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी राजकुमार पी याच्या कोठडीसाठी कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान अतिरिक्त न्यायाधीश सी.एम.पवार यांनी मुंद्रा अदानी पोर्टच्या व्यवस्थापनावर अनेक सवाल उपस्थित केले. मुंद्रा अदानी पोर्ट व्यवस्थापनाची, अधिकाऱ्यांची यामध्ये काही भूमिका होती का, याची चौकशी झाली पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात परदेशातून ड्रग्ज पोर्टवर येते आणि पोर्ट व्यवस्थापन याबाबत अंधारात कसे होते, असा सवालही कोर्टाने विचारला आहे. यामध्ये व्यवस्थापनाला किंवा अधिकाऱ्यांना काही मोबदला मिळाला का, असा सवालही कोर्टाने उपस्थित केला आहे.

एवढेच नाही तर कोर्टाने DRIला परदेशातून येणारे असे कंटेनर तपासण्याची आणि स्कॅन करण्याची मुंद्रा अदानी पोर्टची प्रक्रिया काय आहे, याचीही तपासणी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात DRIने ड्रग्ज जप्त केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचे कोर्टाने म्हटले आहे. विजयवाडा इथल्या कंपनीचे कंटेनर आसपासच्या चेन्नई किंवा इतर बंदरांमध्ये न जाता मुंद्रा अदानी पोर्टमध्ये का आले, असाही सवाल कोर्टाने विचारला आहे. याप्रकऱणी डीआरआयने आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे. आशी कंपनीच्या प्रवर्तकांचाही यात समावेश आहे.

या प्रकरणाला अनेक कंगोरे आहेत, त्यामुळे सर्व बाजूंनी तपास झाला पाहिजे, असेही कोर्टाने म्हटले आहे. याआधी अदानी ग्रुपने Adani Ports and Special Economic Zone च्या वतीने निवेदन प्रसिद्ध करुन आपली भूमिका स्पष्ट केली होती. "पोर्ट व्यवस्थापनाची भूमिका मर्यादित असते. आम्ही फक्त पोर्टचे संचालन करतो. कंटेनरच्या आत काय आहे, हे तपासणीचे अधिकार आम्हाला नाहीत", असे त्यांनी स्पष्ट केले होते.


Updated : 29 Sept 2021 2:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top