उद्धव ठाकरे आणि राऊतांना कोर्टाकडून जामीन
X
शिंदे गटासोबत गेलेले खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.
15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. या सुनावणीसाठी संजय राऊत हे न्यायालयात उपस्थित होते. यावेळी राहुल शेवाळे यांनी केलेले आरोप मान्य नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. माझगाव कोर्टानं हा जामीन मंजूर केला आहे. 14 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी हजर होते. राहुल शेवाळे यांनी केलेले आरोप मान्य आहेत का, अशी विचारणा कोर्टानं केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी आरोप मान्य नसल्याचं म्हटलं आहे.
दैनिक सामनात आपल्याविरोधात बदनामीकारक मजकूर छापून आला आहे असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. महत्त्वाची बाब म्हणजे याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नसून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. माझगाव न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दिलासा मिळाला आहे.