नागपूरमधील समता प्रतिष्ठानमध्ये आर्थिक घोटाळा, काही अधिकारी निलंबित
X
नागपूरमधील समता प्रतिष्ठानमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे विधानसभेत दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त तत्कालीन सरकारने नागपूर येथील समता प्रतिष्ठानच्या मार्फत आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे लेखा परीक्षण अहवालात उघड झाले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी कॅगला यासंदर्भातील काही माहिती जाणीवपूर्वक दिली नाही असेही स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे समता प्रतिष्ठानच्या या आर्थिक गैव्यवहाराची चौकशी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली असून, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली.
सामाजिक न्याय विभाग व बार्टीमार्फत नागपूर येथील समता प्रतिष्ठान या संस्थेची नेमणूक करत त्या संस्थेस १६ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला होता. या निधीचा अपव्यय करत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. दरम्यान आर्थिक लेखा परीक्षणामध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याने धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची नावे सभागृहाच्या पटलावर ठेऊन त्यांच्यावर निलंबनाची घोषणा केली.
संबंधित अधिकाऱ्यांचे यांचे राजकीय हितसंबंध शोधून त्यांच्यावरदेखील कारवाई करावी असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ज्या अधिकाऱ्यांना निलंबित केले त्यांच्या वरिष्ठांचा या गैरव्यवहारात सहभाग आहे का याचीही चौकशी केली जाणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी जाहीर केले.