वारस नोंदी साठी दारू मटण पार्टीसह मोजले ६० हजार
सरकारी काम सहा महीने थांब अशी म्हण असताना राज्याच्या कृषीराज्य मंत्र्यांच्या गावाजवळ वारस नोंदी साठी दारू मटण पार्टीसह ६० हजार रुपये मोजल्याचा प्रकार घडला आहे. कृषिराज्यमंत्र्यांच्या गावाशेजारील वांगी गावातील शेतकऱ्याची फरपट यानिमित्ताने दिसून आली आहे.
X
सरकारी काम सहा महीने थांब अशी म्हण असताना राज्याच्या कृषीराज्य मंत्र्यांच्या गावाजवळ वारस नोंदी साठी दारू मटण पार्टीसह ६० हजार रुपये मोजल्याचा प्रकार घडला आहे. कृषिराज्यमंत्र्यांच्या गावाशेजारील वांगी गावातील शेतकऱ्याची फरपट यानिमित्ताने दिसून आली आहे.
वांगी येथील चंदा आनंदा कांबळे यांच्या वडिलांच्या मृत्युनंतर त्यांच्या आई भाउ व बहिण अशी सर्वांची वारसनोंद १९८६ या वर्षी झाली होती. या नोंदिमध्ये इतर कब्जेदार सदरात असणारी बहिणींची नोंद हस्तलिखित उताऱ्यातदेखील कायम आहे. हा हस्तलिखित सातबारा ऑनलाईन करत असताना यातील यातील काही उताऱ्यावर असलेली इतर हक्कातील वगैरे ४ हा शेराच उडविण्यात आला. यानंतर चंदा कांबळे या १९९८ साली मयत झाल्या. त्यानंतर त्यांचा मुलगा राहुल व वडील आनंदराव कांबळे हे पुढील वारस नोंदी करण्यासाठी अनेक दिवसांपासून तलाठी कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. या काळात त्यांच्या कडून तत्कालीन तलाठी दिलीप चौरे यांनी चक्क जेवणावळी दारू तसेच पैशांची ची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदर मागणी एका मध्यस्थामार्फत केल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते सांगतात ज्या ज्या वेळी मला मागणी झाली त्या त्या वेळी पै पाहुण्यांकडून पैसे घेऊन मी ती मागणी पूर्ण केली. एकदा मध्यस्थीकरवी रोख ४० हजार त्यानंतर वांगी येथील निवासी शाळेजवळ प्रत्यक्ष दहा हजार आणि एका हॉटेल जवळ दहा हजार असे पैसे दिले. तत्कालीन तलाठी चौरे तसेच सध्या असलेले तलाठी कुंभार यांच्यासह इतर चारजण माझ्या घरी या कामाच्या बदल्यात जेवायला आले होते यावेळी त्यांनी महागड्या दारूची मागणी केली. या मागण्या पूर्ण करून पैसे देऊनही त्यांनी काम केले नाही. त्यानंतर त्या तलाठ्याची बदली झाली. नव्या आलेल्या तलाठ्याने सुद्धा तोच प्रकार करत कामात दिरंगाई केली.
आनंदराव कांबळे यांनी दिलेल्या पैशांचा हिशेब त्यांच्या पर्सनल डायरीमध्ये नमूद केले आहेत.
डायरीचा फोटो
या संदर्भात आम्ही तत्कालीन तलाठी दिलीप चौरे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी यांच्याशी फोनवरून वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांना मेसेज केला असता त्यांनी माझ्याकडे तो विषय नाही म्हणत हात झटकले.
सध्या असलेले तलाठी रघुनाथ कुंभार यांना आम्ही प्रत्यक्ष फोन करून याबाबत विचारणा केली परंतु त्यांनी अर्ध्या तासात फोन करतो असे सांगितले. त्यांच्या अर्धा तास संपण्याची वाट आम्ही २४ तास पाहिली पण त्यांचा फोन आला नाही. त्यानंतर आम्ही त्यांना मेसेज केला पण तरीही त्यांनी प्रतिसाद दिला नाही..
यानंतर आम्ही निवासी नायब तहसीलदार भिसे यांची भेट घेतली त्यांना तोंडी हा प्रकार सांगितला असता. हे अतिशय सोपे आणि काही दिवसांचे काम असल्याचे सांगत संबंधित आनंदा कांबळे यांच्याकडून नव्याने अर्ज घेत तात्काळ नोंद घेत असल्याचे सांगितले...
याबाबत वांगी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत होनमाने यांनी या घटनेमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले
सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावात हस्तलिखित सातबारा ऑनलाईन करत असताना काही नावे वगळण्याचे तसेच इतर हक्कात टाकण्याचे प्रकार देखील घडले आहेत. यामागे मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे.या सर्व घटनांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी.
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या गावाशेजारी असलेल्या वांगी गावात हा प्रकार घडला असून महसूल प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.