ठाण्यात 15 ते 18 वयोगटासाठी 3 जानेवारीपासून मिळणार कोरोना प्रतिबंधक लस
X
ठाणे : ठाण्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांना येत्या 3 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर ठाणे महापालिकेने ही महत्त्वाची घोषणा केली आहे. तर 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाइन वर्कर्सना लसीचा तिसरा डोस येत्या 10 जानेवारीपासून
देण्यात येणार आहे याबाबत महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी माहिती दिली आहे. लसीकरणासाठी 15 ते 18 वर्षांची मुले आपल्या आयडी कार्डवरून कोविन अॅपवर नोंदणी करू शकतात. 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व किशोरवयीन मुले या लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. ऑनलाइन किंवा केंद्रात जाऊनही नोंदणी करता येऊ शकते. 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लसीकरणामध्ये (15 ते 18 वर्षे) किशोरवयीन मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीचा एकमेव पर्याय उपलब्ध असणार आहे.
तर जेष्ठ नागरिकांना गंभीर आजार असल्यास कोरोना प्रतिबंधक तिसरा डोस घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागणार आहे, दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनंतर किंवा 39 आठवड्यांनंतरच तिसरा डोस दिला जाणार आहे. तर हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या कोविन ॲपच्या माध्यमातून हा प्रतिबंधनात्मक डोस मिळणार आहे. त्यांना हा डोस कधी द्यायचा आहे, याबद्दल जुन्या नोंदणीकृत नंबरवर एसएमएसद्वारे देखील कळवले जाणार आहे.