गोळी खाऊन घरबसल्या कोरोनावर होणार उपचार; Paxlovid ला मिळाली मंजुरी
अमेरिकेत फार्मा कंपनी फायझरच्या कोरोनाच्या अँटी-व्हायरल औषधाच्या घरगुती वापरास मान्यता देण्यात आली आहे. घरगुती कोरोना उपचारांत समाविष्ट केलेलं हे अमेरिकेतील पहिलं औषध ठरलं आहे
X
वॉशिंग्टन// अमेरिकेत फार्मा कंपनी फायझरच्या कोरोनाच्या अँटी-व्हायरल औषधाच्या घरगुती वापरास मान्यता देण्यात आली आहे. घरगुती कोरोना उपचारांत समाविष्ट केलेलं हे अमेरिकेतील पहिलं औषध ठरलं आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने ही परवानगी दिल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
Pfizer ने दावा केला आहे की, त्यांच्या अँटीव्हायरल औषधाने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका आणि कोरोना बाधितांच्या मृत्यूची शक्यता 89 टक्क्यांनी कमी होते.
सोबतच त्यांचं अँटीव्हायरल औषध Paxlovid हे Omicron प्रकाराविरूद्ध 90 टक्के प्रभावी असल्याचाही दावा कंपनीनं केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, याबाबत प्रयोगशाळेच्या डेटाद्वारे हे सिद्ध झाले आहे, की हे अँटी-व्हायरल औषध ओमायक्रॉनने संक्रमित लोकांमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका 90 टक्क्यांनी कमी करेल.
अमेरिकेसह जगभरातील बहुतांश देशांमध्ये सध्या कोरोनाच्या उपचारासाठी फक्त इंजेक्शनचा वापर केला जात आहे. आणखी एक औषध निर्माता कंपनी मर्कनेही दावा केला आहे की, त्यांनी तयार केलेलं कोरोनाविरुद्ध औषध ओमिक्रॉन प्रकारावरही प्रभावी ठरेल. मर्क कंपनीने कोविड-19 विरुद्ध अँटीव्हायरल औषध मोलनुपिरावीर विकसित केलं आहे. मात्र, अद्याप या औषधाला यूएस नियामकांकडून मंजुरी मिळालेली नाही.