Home > News Update > वृध्द कोरोना मुक्त आईला, चार मुलांनी घरात प्रवेश नाकारला, ग्रामपंचायतने दिला आधार...

वृध्द कोरोना मुक्त आईला, चार मुलांनी घरात प्रवेश नाकारला, ग्रामपंचायतने दिला आधार...

वृध्द कोरोना मुक्त आईला, चार मुलांनी घरात प्रवेश नाकारला, ग्रामपंचायतने दिला आधार...
X

कोरोना नंतरच भयाण सामाजिक वास्तव समोर यायला लागली आहेत. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील चिनावल येथ समोर आली आहे. सुमनबाई प्रभाकर मालखेडे ह्या चिनावल येथे राहणाऱ्या वृद्ध महिलेचा सात मे रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 12 दिवसांनी सुमनबाई कोरोनातुन बऱ्या झाल्या. यामुळे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुलांना फोन केला. तुमच्या आई बऱ्या झाल्या आहेत. तुम्ही येऊन आईला घेऊन जा. असं सांगितल्यावर उद्या येतो असं मुलांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितलं.

मात्र, दुसऱ्या दिवशी मुल आईला घेण्यास आलेच नाहीत. आरोग्य अधिकाऱ्यांनी वारंवार फोन करूनही मुलांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

चार मुलांनी आईला घरात घेण्यास नकार दिला...

कोरोना मुक्त आईला दोन दिवस होऊन ही मुलं रुग्णालयात घेण्यासाठी येत नसल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी चिनावल येथील सरपंच भावना बोरोले यांना संपर्क साधला. सरपंच बोरोले यांनी पतीच्या मदतीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करून सुमनबाईंना चिनावल गावात आणण्यात आलं. घरात सुनेला आणि नातूलाही कोरोना झाला आहे, घर लहान आहे असं सांगून चारही मुलांनी आईला घरात घ्यायला नकार दिला. चारही मुलं वीट भट्टीवर काम करतात.

महिला सरपंचाने दिला आधार -

चारही मुलांनी आईला घरात घेण्यास नकार दिल्यानंतर सरपंच भावना बोरोले यांनी सुमनबाईं यांना बालवाडी केंद्रात राहण्याची व्यवस्था करून दिली. त्यांच्या खाण्यापिण्याची स्वतःच व्यवस्था करून दिली. दोन दिवसांपासून सुमनबाई राहत आहेत. आपल्या मुलांना काही बोलू नका अशी विनवणी गावकऱ्यांना सुमनबाई करत आहे.

सामाजिक बांधिलकी म्हणून मदत -

मुलांनी आईला घरात घेण्यास नकार दिल्यावर काय करायचं? हा प्रश्न निर्माण झाला. मात्र, गावातील सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन कुटूंब प्रमुख आणि माणुसकीच्या नात्याने सुमनबाईंची व्यवस्था करून दिली. असं गावाच्या सरपंच भावना बोरोले ह्या सांगतात.

कोरोनाबाधित वयोवृद्ध आई वडील बोज झाल्याची मुलांची भावना वाढीस...

वयोवृद्ध सुमनबाई सारख्या अनेक घटना कोरोना काळात समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथंही अश्याच घटना समोर आल्यात. सरकारी रुग्णालयात कोरोना बाधित वयोवृद्ध आई वडिलांना दाखल करते वेळी पोटच्या मुलांनी खरा पत्ता व फोन नंबर चुकीचे दिले होते.

रुग्ण बरे झाल्यानंतर आरोग्य कर्मचारी फोन केल्यावर ह्या बाबी समोर आल्यात. वयोवृद्ध आई वडील बरे झाले तर घरी नको तसेच कोरोनामुळे मृत्यू झाला तर सरकारी नियमानुसार रुग्णाची व्यवस्था लावली जाते. आपल्याला त्रास नको ही भावना कोरोना काळात मुलांमध्ये तसंच नात्यांमध्ये वाढीस लागली आहे.

नात्यांचा आणि मित्रांचा आधारच कोरोना ची लढाई जिंकण्यासाठी आधार ठरत असतांनाच दुसरी कडे कोरोना मुळे अनेक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. हे कोरोना काळातील सामाजिक भयाण वास्तव आहे.

Updated : 21 May 2021 2:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top