बीडमध्ये कोरोना नियम पायदळी, जमावबंदीतही शाही पार्टीची दावत
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने निर्बंध जारी केले आहेत. तर लॉकडाऊन टाळण्यासाठी नागरीकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. मात्र बीड जिल्ह्यात कोरोना नियमांना पायदळी तुडवत जमावबंदी असतानाही पटेल कुटूंबियांनी शाही पार्टीची दावत दिली.
X
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने कोरोना निर्बंध कठोर केले आहेत. तर सरकारने नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. पण यापार्श्वभुमीवर बीडमधील आशिर्वाद लॉन्समध्ये पटेल कुटूंबियांकडून कोरोना नियमांना हरताळ फासत शाही पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत लहान मुले-महिलांसह शेकडो लोक सहभागी झाले होते. तर या विशेष शाही पार्टीत बीडमधील अनेक राजकीय नेते आणि प्रतिष्ठीत लोकही हजर होते. तर तोंडाला मास्क न लावता कोरोना नियम धाब्यावर बसवले होते.
दरम्यान तहसिलदारांसह ३ पोलिस कर्मचारी, तलाठी आणि नगरपालिका कर्मचारी यांनी आशीर्वाद लॉन्स येथे भेट देत आयोजकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामध्ये कोरोना नियमांची पायमल्ली करणारांना प्रत्येकी 500 रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र पटेल कुटूंबियांनी दंडाची रक्कम कमी करण्यासाठी राजकीय व्यक्तींना फोन केला. त्यानंतर प्रशासनाने आयोजकांना 1 हजार रुपये दंड आकारला. त्यामुळे सामान्य नागरीकांना वेगळा आणि राजकीय व्यक्तींना वेगळा न्याय का?, असा सवाल नागरीकांकडून केला जात आहे.
राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभुमीवर तिसरी लाट जाहीर करण्यात आली आहे. त्यापार्श्वभुमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लग्नसमारंभाला केवळ 50 तर अंत्यविधीला 20 लोकांनाच एकत्र येण्याची परवानगी आहे. याबरोबरच कोरोना नियमांचे पायमल्ली केल्यास प्रतिव्यक्ती 500 रुपये दंड अकारण्यात येणार आहे. मात्र बीडमध्ये जमावबंदी असतानाही शेकडो लोक एकत्र आले असतानाही आयोजकांना केवळ 1 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. त्यामुळे दंडाची रक्कम कमी करण्यासाठी प्रशासनावर दबाव कोणी आणला?, सामान्य नागरीकांना एक आणि राजकीय व्यक्तींना वेगळा न्याय का? असा सवाल केला जात आहे. तसेच "दंड फक्त नावाला अन संसर्ग होऊद्या गावाला" असा प्रकार बीडमध्ये सुरू असल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.