Home > News Update > राज्यात पुन्हा मिनी-लॉकडाऊनचे संकेत : पुण्यात कडक निर्बंधाची घोषणा

राज्यात पुन्हा मिनी-लॉकडाऊनचे संकेत : पुण्यात कडक निर्बंधाची घोषणा

राज्यात पुन्हा मिनी-लॉकडाऊनचे संकेत : पुण्यात कडक निर्बंधाची घोषणा
X

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे संध्याकाळी समाजमाध्यमांवर राज्याला संबोधीत करत असताना पुण्यातील करोनास्थितीची आढावा बैठक पार पडल्यानंतर आज पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याची महत्वाची घोषणा केली आहे. पुण्यातील कोरोना संक्रमण वाढत असल्यानं पुणे पीएमपीएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार आहे. पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली. याशिवाय पुढील दोन दिवसांत प्रतिदिवस करोनाबाधितांची संख्या ९ हजारांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असणार आहे. इतर सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत. अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे. सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार आहेत. अशी देखील माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. मंडई आणि मार्केट यार्ड सुरू राहणार आहे. पण अंतर ठेवून खरेदी करावी लागणार आहे. गार्डन आणि जिम सकाळच्या वेळेत सुरू राहणार आहे. शाळा, महाविद्यालयं ३० एप्रिल पर्यंत बंद असणार आहेत. तर, यामध्ये इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नियोजन सुरू आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांटी गैरसोय होऊ देणार नसल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. आता पुढील आठवडयात म्हणजे शुक्रवारी निर्बंधांचा फेरआढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही निश्चितच चिंताजनक आहे. याच अनुषंगाने पायाभूत सुविधांवर भर देणं. आरोग्य सुविधा बळकट करणं, ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर्स आदींची संख्या वाढवणे हे आवश्यक आहे. काल महत्वाच्या रूग्णालयांसोबत एक बैठक झाली, त्या अनुषंगाने आपण रूग्णालयांमधील बेड्सची संख्या वाढवत आहोत. जर रूग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर निश्चितच काही रूग्णालयांना आपल्याला १०० टक्के कोविड रूग्णालय म्हणून घोषित करावं लागेल, असंही राव यांनी स्पष्ट केलं आहे. ग्रामीण भागात सध्या ज्या ठिकाणी व्हेटिंलेटर्स वापरात नाहीत, ते हळूहळू शहरी भागात हलवले जात आहेत. याचं कारण म्हणजे शहरी भागांमधील रूग्णालयात मोठ्यासंख्ये ग्रामीणभागातूनही रूग्ण दाखल होत आहेत. याशिवाय अन्य जिल्ह्यांमधून देखील रूग्ण आता पुण्यात दाखल होत आहेत त्यामुळे सर्वत्र दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्याची बेड स्थिती

एकूण बेड्सची स्थिती

– ऑक्सिजन बेड्स – 9118

– ऑक्सिजन विरहीत बेड्स – 41093

– आयसीयु बेड्स – 2927

– व्हेंटिलेटर्स बेड – 996

उपचार बेडची स्थिती

ऑक्सिजन बेडवर उपचार संख्या – 2974

ऑक्सिजन विरहीत बेडवर उपचार संख्या – 11563

आयसीयु बेडवर उपचार संख्या – 1073

व्हेंटिलेटर्स बेडवर उपचार संख्या – 376

शिल्लक बेडची स्थिती

– ऑक्सिजन बेड्स – 6144

– ऑक्सिजन विरहीत बेड्स – 29530

– आयसीयु बेड्स – 1854

– व्हेंटिलेटर्स बेड – 620

रुग्ण संख्येची स्थिती

– ऍक्टिव्ह रुग्ण – 61740

– रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या – 15986 ( यामधील गंभीर रुग्ण 4423 )

– घरी उपचार घेणारे रुग्ण – 45754

12 एप्रिल पर्यंतचा प्रशासकीय अनुमान

– ऑक्सिजन विरहित फक्त 9 बेड्स शिल्लक राहतील

– 3207 ऑक्सिजन बेडची कमतरता भासेल

– 462 आयसीयु बेड शिल्लक राहतील

– 647 व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल

जिल्ह्याचा मृत्युदर

– पुणे मनपा – 2 टक्के

– पिंपरी चिंचवड – 1.4 टक्के

– पुणे देहू व खडकी कॉनटोन्मेंट बोर्ड – 2.3 टक्के

– पुणे ग्रामीण – 1.9 टक्के

– पुणे जिल्ह्याचा एकूण मृत्यू दर – 1.8

Updated : 2 April 2021 3:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top