Home > News Update > राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य
X

भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतल्यापासून चर्चेत आहेत. त्यातच औरंगाबाद येथे बोलत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केल्याने राज्यात नवा वाद पेटला आहे.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. यामध्ये राज्यपालांनी समर्थ नसते तर शिवाजीला कोणी विचारलं असतं का? असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा समाजमाध्यमांवर जोरदार निषेध व्यक्त केला जात आहे.

यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात गुरूची परंपरा मोठी आहे. ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. त्याप्रमाणेच समर्थ नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर चंद्रगुप्त असता का? असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून राज्यात नवा वाद पेटला आहे.

पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले, मी शिवाजी महाराजांना कमी लेखतोय असे नाही. पण ज्या माणसाला गुरू नाही. त्याची महती उरत नाही. शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांच्या कृपेने स्वराज्य मिळाले, असे शिवाजी महाराज सांगतात. त्यामुळे शिवाजी महाराजांनी समर्थांना स्वराज्याच्या चाव्या गुरुदक्षिणा म्हणून दिल्या होत्या, असे वक्तव्य राज्यपालांनी केले. मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांच्या विधानाचा निषेध करत त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागितली नाही तर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असे मिटकरी यांनी सांगितले.

राज्यपालांच्या विधानावर शिव चरित्र अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी प्रतिक्रीया दिले आहे. त्यामध्ये कोकाटे यांनी म्हटले आहे की, राज्यपाल हे बेताल, निराधार आणि खोडसाळ वक्तव्य करण्यास प्रसिध्द आहेत. त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभ्यास करावा, आणि मग बोलावं. समर्थ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कधीच गुरू नव्हते, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.

Updated : 28 Feb 2022 10:51 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top