प्रतिभाशाली उमदे नेतृत्व हरपले! राजीव सातव यांना अशोक चव्हाण यांची श्रद्धांजली
X
कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते कोरोनातून बरे देखील झाले होते. कोरोना नंतरच्या व्याधीने त्यांचं निधन झालं आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
खासदार सातव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे खा. राजीव सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतूहल होते. महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते. पुढील काळात देश व काँग्रेस पक्षासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित केले जात होते.
खासदार राजीव सातव यांचे निधन काँग्रेस पक्षासाठी मोठी हानी आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देशातील त्यांचा मित्र परिवार आणि चाहत्यांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व सातव कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.