शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यशोमती ठाकूर यांचा सरकारला इशारा
X
अमरावती : विदर्भासह अमरावती जिल्हयामध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिकांचे, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली मागणी केली आहे. अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
गेल्या ४० वर्षात असा पाऊस झाला नाही आणि सरकारचे पर्जन्यमापक यंत्र सदोष असल्याचा आरोपही ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. जिल्हयामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कापूस, तूर, संत्रा, उडीद, मूग या शेतपिकांसह फळबागाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक मंडळ क्षेत्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत. तसेच काही ठिकाणी नुकसान भरपाई देण्याची प्रक्रियाही झालेली नाही. त्यामुळे तत्काळ सर्वेक्षण करुन नुकसानग्रस्त शेतकरी, नागरीक व पशुधन पालकांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.
नदी आणि नाल्यांचे प्रवाह बदलल्यामुळे शेतात पाणी शिरल्याने जमीन खरवडून निघाली आहे. शेतीमध्ये मोठया प्रमाणात पाणी साचल्याने शेतीला तलावाचे स्वरुप आल्याने शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाचे त्वरीत पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतक-यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
जिल्ह्यातील तिवसा व नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी व महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे संत्रा व फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची नोंद सरकारकडे गेलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या नुकसानीचा व नुकसानभरपाई मिळण्याचा अहवाल तातडीने पाठवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तूर पिकाचे नुकसानीचे सुद्धा पंचनामे व्हावेत. तसेच अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने भिंतीची पडझड होत, घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच सर्व सामान्यांना सरसकट मदत मिळवून द्यावी. अन्यथा शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी आम्ही अधिक आक्रमतेने लढा उभारू असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.