पंजाबमध्ये चन्नी-सिध्दू वादाने काँग्रेस बेजार, अखेर घेतला मोठा निर्णय
पाच राज्यांच्या निवडणूका जाहीर झाल्याने प्रत्येक पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. तर पंजाब पुन्हा जिंकणार अशी वल्गना काँग्रेसकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभुमीवर पंजाब काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष सिध्दू आणि मुख्यमंत्री चन्नी यांच्यातील वादाने पछाडले आहे.
X
पाच राज्यात निवडणूका जाहीर झाल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. तर सर्वच पक्षांना बंडाळीचा सामना करावा लागत आहे. यापार्श्वभुमीवर पंजाबमध्ये आप आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह भाजप पंजाब जिंकण्याचा दावा करत आहे. मात्र पंजाब काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिध्दू आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यात पडलेल्या वादाच्या ठिणगीने पंजाब काँग्रेस बेजार झाली आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसने 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर त्यापाठोपाठ काँग्रेसने जाहीर केलेल्या पक्षाच्या जाहीरनाम्यावरून पुन्हा मतभेद निर्माण झाले आहेत. तर पहिल्या यादीत स्थान मिळालेल्या आमदारांची मनधरणी करण्याचे काम पक्षात सुरू आहे. याबरोबरच दुसऱ्या यादीतील सहा आमदारांची तिकीटे कापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या काळात पक्षात फुटीचे वातावरण तयार व्हायला सुरूवात झाली आहे. यापार्श्वभुमीवर नवज्योत सिंह सिध्दू आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत काँग्रेसच्या हायकमांडची बैठक झाली. मात्र या बैठकीत तोडगा न निघाल्याने काँग्रेसने पंजाबसाठी उपसमिती स्थापन केली आहे.
उमेदवारांच्या यादीत मुख्यमंत्री चन्नी यांच्या भावाचे तिकीट कापण्यात आल्याने मुख्यमंत्री चन्नी विरूध्द सिध्दू वाद रंगला होता. मात्र या वादात तोडगा काढण्यासाठी काँग्रेस हायकमांडने समिती स्थापन केली आहे. ही समिती त्या जागांसाठी उमेदवार ठरवणार आहे. तर या समितीत काँग्रेस सरचिटणीस के के वेणूगोपाल, अंबिका सोनी आणि आजय माकन यांचा सामावेश आहे.
त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष सिध्दू आणि मुख्यमंत्री चन्नी यांच्यातील वाद न मिटल्यास पंजाब काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे.