काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना देणार नारळ, पाच राज्यातील पराभवानंतर घेतला निर्णय
देशातील पाच राज्यांच्या निवडणूका पार पडल्या. त्यामध्ये काँग्रेसवर पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. त्यामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाचही राज्यात काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना नारळ देणार असल्याचे समोर आले आहे.
X
उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाचही राज्यांच्या निकालाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले होते. तर काँग्रेसच्या कामगिरीचा आलेख उंचावणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यामध्ये काँग्रेसला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अखेर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाचही राज्यातील प्रदेशाध्यक्षांना हटवण्याचे ठरवले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पाचही राज्यातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली. तर पंजाबमध्ये असलेली सत्ता गमवण्याची वेळ काँग्रेसवर आली. त्याबरोबरच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात उत्तरप्रदेशात काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली. त्यामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाच राज्यातील काँग्रेसच्या पराभवाचे विश्लेषण करतानाच कठोर पावले उचलण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाचही राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना हटवण्यात येणार आहे. याबाबत काँग्रेस प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी माहिती दिली आहे.
रणदीप सिंह सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पुनर्बांधणीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना राजीनामे देण्यास सांगितले आहे.
Congress President, Smt. Sonia Gandhi has asked the PCC Presidents of Uttar Pradesh, Uttarakhand, Punjab, Goa & Manipur to put in their resignations in order to facilitate reorganisation of PCC's.
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 15, 2022
पाच राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यामुळे अखेर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाचही राज्याच्या प्रदेशाध्यक्षांना आपले राजीनामे देण्यास सांगितले आहे. तर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी यांनी घ्यावे, असा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. मात्र काँग्रेसचे अध्यक्षपद हे सोनिया गांधी यांच्याकडेच कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाला. तर पाचही राज्यातील पराभवाला काँग्रेसचा प्रत्येक नेता आणि खासदार जबाबदार असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले.