केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या तोंडाला पांढरे फासू - औताडे
X
काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा काँग्रेस सेवादलातर्फे जाहीर निषेध करण्यात आला. सोबतच त्यांच्या तोंडाला पांढरे फासू असा इशारा काँग्रेस सेवादलाने दिला.
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे पक्षाचे नेते खा राहुल गांधी यांच्याविषयी जी गरळ ओकली त्याचा आम्ही निषेध करतो असं यावेळी काँग्रेस सेवादलाचे विलास औताडे यांनी म्हटले आहे.
भाजपा देशातील जनतेच्या समस्या, महागाई, बेरोजगारी महिलांवर होणारे अत्याचार कोरोना व लसीकरणतील अपयश, देशातील मोठ्या प्रमाणात बंद पडलेली कारखानदारी व त्यामुळे निर्माण झालेली बेकारी याकडे दुर्लक्ष करत आहे, उलट समाजा-समाजात जातीय भावनेतून भांडणे लावण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यावर हे भाजपा सरकारचे मंत्री ब्र शब्द बोलायला तयार नाहीत किंवा पेट्रोल- डिझेल , गॅस अशा जीवनावश्यक वस्तूंच्या वाढणाऱ्या भरमसाठ किंमती कमी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न हे सरकार करीत नसून केवळ गांधी घराण्याच्या नावाने खडे फोडण्यातचे काम करत असून सामान्य जनतेच्या समस्यावर मात्र हे सरकार गप्प असल्याचे दिसत आहे असं विलास औताडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
मागे अशाच प्रकारे देशातील सैनिकाबद्दल, शेतकऱ्याबद्दल अपशब्द वापरणारे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे विकासशुन्य खासदार असून अशा निष्क्रिय मंत्र्याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो असं प्रदेशाध्यक्ष औताडे म्हणाले.
दरम्यान भाजप मंत्री व नेत्यांकडे विकास कामाचे कोणतेही मुद्दे नसल्याने ते अधून-मधून वादग्रस्त टिप्पणी करून जनतेची दिशाभूल करीत आहे, या वादग्रस्त विधानांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची मूक संमती असल्याचे चित्र दिसून येत असल्याचा आरोप यावेळी विलास औताडे यांनी केला.