महागाईविरोधात ३१ मार्चपासून काँग्रेसचा राज्यव्यापी 'महागाईमुक्त भारत' आंदोलन सप्ताह
X
केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात १३६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांना त्रस्त करणा-या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर 'महागाईमुक्त भारत' आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, 'गरज सरो, वैद्य मरो' या म्हणीसारखा भाजपाचा कारभार आहे. निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामारे जायला नको म्हणून इंधन दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपल्या मते घेतली निवडणून आले आणि लगेचच जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच दिवसात पेट्रोल, डिझेल ३.२० रुपये प्रति लिटर महाग झाले आहे तर एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. काही ठिकाणी एलपीजी सिलिंडर १००० ते ११०० रुपये एवढ्या किमतीला घ्यावा लागत आहे. सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून १ एप्रिलपासून औषधांचे दरही वाढणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटत असून त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही.
मोदी सरकारच्या या निर्णयाचे चटके देशातील जनता भोगत असून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतील. तर २ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयी महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे. तर ७ एप्रिल रोजी राज्य मुख्यालयी मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन केले आहे. ह्या आंदोलनात काँग्रसेचे सर्व मंत्री, नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील सर्वसामान्य जनतेने, स्वयंसेवी संघटनानी रिक्षा टॅक्सी असोसिएशन यांनीही या आंदोलन सहभागी होऊन केंद्र सरकारकडून सुरु असलेल्या दरोडेखोरीविरूद्ध आवाज उठवावा.
संघटीत व असंघटीत कामगारांच्या समस्या व मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात डाव्या पक्षांच्या कामगार संघटनांनी २८ व २९ मार्च रोजी देशव्यापी संप पुरकारला आहे, या संपाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.
भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, दररोज उठून भ्रष्टाचाराचे आरोप करुन राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे. दररोजच्या या नौटंकीला जनता कंटाळली आहे. कोण भ्रष्टाचारी आहे? हे जनतेलाही माहित आहे. याच किरिट सोमय्या यांनी नारायण राणे, कृपाशंकरसिंह यांच्यावरही याच पद्धतीचे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ह्या दोघांनी भाजपात प्रवेश केल्यांतर ते गंगास्नान करुन पवित्र झाले का? असा उलटा सवाल केला. केंद्रातील मोदी सरकारचे पाप झाकण्यासाठी भ्रष्टाचाराच्या नावाने वातावरण निर्मिती करण्याचे काम भाजपा करत आहे. हे सर्व थांबवा व महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वजण मिळून काम करु असे आवाहन नाना पटोले यांनी केले. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसिम खान, माजी मंत्री अनिस अहमद, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष एम एम शेख, भाईजान उपस्थित होते.