रायगडात शिवसेना राष्ट्रवादीचा संघर्ष टोकाला, आघाडीत बिघाडीचे संकेत
X
राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. कर्जत तालुक्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार महेंद्र थोरवे व राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश लाड यांच्यात लढत झाली होती. यामध्ये सुरेश लाड यांचा पराभव झाला तर महेंद्र थोरवे हे कर्जत मतदार संघाचे आमदार झाले.
तर इकडे राज्याच्या सत्तेतील राजकारणात शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आले. मात्र स्थानिक पातळीवर नेते मंडळी व कार्यकर्ते आजही जुळवून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी व शिवसेनेत सतत वादाची ठिणगी पडताना पाहायला मिळत आहे.
त्याच झालं असं की शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या भव्य प्रशासकीय भवनाचा भूमिपूजन सोहळा विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी ११ वाजता पार पडला. मात्र, महाविकास आघाडी असूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांना या कार्यक्रमात डावलण्यात आल्याने माजी आमदार सुरेश लाड हे संतप्त झाले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत नियोजित वेळेच्या अगोदरच सकाळी १० वा . भूमिपूजन स्थळी पोहोचून श्रीफळ वाढवून भूमिपूजन केले. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली आहे.
एकाच दिवसात एकाच कामाचे दोन वेळा झालेले भूमिपूजन कर्जतकरांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. राज्याच्या सत्तेत आलबेल असलेल्या महाआघाडीत स्थानिक पातळीवर आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. कर्जत येथील प्रशासकीय भवनासाठी आम्ही शासनाकडे प्रयत्न करून अर्थसंकल्पात मंजुरी मिळवली होती. आणि या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यास पालकमंत्री, महसूलमंत्री यांना डावलले जात असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. असे माजी आमदार सुरेश लाड यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
मुळातच या भवनाच्या कामाला मंजुरी मिळाल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली होती. त्यापैकी शिवसेना आणि राष्ट्रवादीचा उद्रेक भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळाला.
काय आहे प्रकरण?
हे प्रशासकीय भवन उभे राहण्यासाठी माजी आमदार सुरेश लाड हे २००४ पासून प्रयत्नशील होते. या संदर्भात त्यांनी अधिवेशनात मुद्दाही उपस्थित केला होता. देशाचे तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार हे २०११ मध्ये कर्जत नगर परिषदेच्या उदघाटनाला आले असता, त्यावेळी तत्कालीन आमदार लाड यांनी कर्जतमधील प्रशासकीय भवनसाठी शहराला लागून असलेली कृषी संशोधन केंद्राची जमीन देण्याची मागणी केली होती. त्या मागणीबद्दल आपण सहानभूतीपूर्वक विचार करू असे आश्वासन शरद पवार यांनी जाहीरपणे केले होते.
मात्र, कर्जत शहराच्या दोन भागात असलेली दापोली कृषी विद्यापिठाच्या भात संशोधन केंद्राची जमीन देता येणार नाही. असं स्पष्ट झाल्यानंतर कर्जत शहरातील पोलीस मैदान भागातील तहसिलदार निवासस्थान, तेथील तलाठी कार्यालये, मंडळ अधिकारी कार्यालये यांच्या ठिकाणी प्रशासकीय भवन उभारण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१४ मध्ये आराखडा तयार केला.
तसेच मात्र, गेल्या 5 वर्षात सेना भाजपची सत्ता आल्याने शिवसेनेच्या विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या काळात या कामाला मंजुरी मिळून निधी प्राप्त झाला केला. त्यामुळं दोनही आमदार या कामावर दावा करत आहेत.
माजी आमदार लाड यांचा आरोप...
शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी भूमिपूजन सोहळ्याला राष्ट्रवादीच्या पालकमंत्री अदिती तटकरे तसेच माजी आमदार सुरेश लाड यांना आमंत्रण न दिल्याने प्रोटोकॉल पाळला नाही. असा आरोप माजी आमदार लाड यांनी आमदार थोरवे यांच्यावर केला आहे.
या कामासाठी शासनाने निधी दिला आहे, त्यामुळे हा निधी कुणाच्या घरचा नाही, हा निधी शासनाचा पर्यायाने जनतेचा आहे. त्यामुळे हम करे सो कायदा आता चालणार नाही असे सुरेश लाड यांनी म्हटलं आहे.
आमदार थोरवेंनी घेतला सुरेश लाड यांचा समाचार...
शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी नारळ फोडत भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे माजी आमदार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. लाड यांनी आपला पराभव झाला हे मान्य करावे. जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिले आहे. लाड यांचे वय झाल्याने बहुधा ते आता माजी आमदार आहेत. याचा त्यांना विसर पडला असावा. सुरेश लाड यांचे हे कृत्य निंदनीय आहे. यापुढे असे काही कृत्य केल्यास शिवसेना गप्प बसणार नाही. आघाडीत बिघाडी करू नका. असा इशाराही आमदार थोरवे यांनी लाड यांना दिला . या भूमिपूजन सोहोळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
सोशल डिस्टन्स चे नियम पायदळी...
दरम्यान भूमिपूजन सोहळ्यात सोशल डिस्टंसीगचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले होते. कामचं श्रेय घेण्याच्या लढाईत शक्तिप्रदर्शन झाले. अन शासन नियमांचा भंग झाला. या सोहोळ्याला सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रेयवादाच्या लढाईत भाजपची उडी...
श्रेयवादाच्या लढाईत मागे राहिल ते भाजप कसं. भाजपने देखील या श्रेयवादाच्या लढाईत उडी घेतली असून, सदरच्या प्रशासकीय इमारतीसाठी तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे व किसान मोर्चाचे सुनील गोगटे यांनी दावा केला आहे. या वादावर पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी कसा तोडगा काढणार याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.