'या' राज्यात झाली इंधन टंचाई ; इंधन खरेदीवर अनेक निर्बंध
मिझोराम आणि आसाम यांच्यातील संघर्षामुळे मिझोरामध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मिझोराम सरकारने इंधन विक्रीबाबत पेट्रोल पंपचालकांवर अनेक निर्बंध आणले आहेत.
X
नवी दिल्ली : एकीकडे देशभरातील नागरिक इंधन दरवाढीमुळे त्रस्त असताना मिझोराममध्ये तर एक नवा पेच निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून आसाम आणि मिझोराममध्ये संघर्ष निर्माण झाल्याने, आसाम आणि मिझोराममधील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. याचाच परिणाम मिझोराममधील इंधन पुरवठ्यावर झाला आहे.
मिझोरामला जाण्यासाठीचा राष्ट्रीय महामार्ग आसाममधून जातो. मात्र, दोन्ही राज्यामधील संघर्षामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मिझोराममध्ये इंधनाचे टँकर पोहोचू शकत नसल्याने मिझोराममध्ये प्रचंड इंधन टंचाई निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मिझोराम सरकारने राज्यातील सर्व पेट्रोल पंपचालकांना महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत. मिझोरान सरकारने प्रत्येक वाहनासाठी इंधनाची मर्यादा ठरवून दिले आहेत. त्यानुसार दुचाकी वाहनाला 5 लीटर तर चारचाकी वाहनांना फक्त 10 लीटर इंधन मिळणार आहे. तर सहा, आठ आणि बारा चाकांच्या अवजड वाहनांना एकावेळी 50 लीटर आणि पिकअप ट्रक्सना एकावेळी फक्त 20 लीटर इंधनाची मर्यादा घालण्यात आली आहे.
मिझोराममध्ये निर्माण झालेल्या या इंधन टंचाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, दोन्ही राज्यामधील या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा फटका हा अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना बसू नये याची काळजी मिझोराम सरकारने घेतली आहे. या वाहनांना येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी आवश्यक असेल इतक्याच इंधनाचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच पेट्रोल पंपांवरुन कॅनमध्ये इंधन भरून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.