१५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार पण जबाबदारी विद्यापीठांची
अखेर राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठीचे नियम आणि अटीही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
X
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय़ घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पण महाविद्यालये सुरू करण्यासाठी एसओपी ठरवण्याची जबाबदारी विद्यापीठांवर देण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे. सुरूवातीला ५० टक्केच विद्यार्थ्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारी ते ५ मार्च या काळात ५० टक्के विद्यार्थ्यांना परवानगी देऊन त्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि मग शंभर टक्के क्षमतेने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
महाविद्यालये सुरू करण्यासाठी अटी व सवलती
महाविद्यालय सुरू करताना UGCच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन विद्यापीठांनी करावे असेही सरकारने काढलेल्या आदेशात सांगण्यात आले आहे.
- एका एकूण क्षमेतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने बसवावे.
- त्या त्या विभागातील जिल्हाधिकारी कार्यालयांना महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील सुविधांची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- जिल्हाधिकाऱ्यांनी त्या भागातील कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावा.
- महाविद्यालये सुरू होत असली तरी वसतीगृह मात्र सध्या सुरू करण्यात येणार नाहीत
- परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने देण्याचा पर्याय.
- ग्रामीण भागात गेलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कॉलेज सुरू ठेवण्याची सवलत
- महाविद्यालयातील ७५ टक्के उपस्थितीची अट ही सध्या स्थगित करण्यात आली आहे.
- अभ्यासक्रम कमी कऱण्याबाबतचा निर्णय विद्यापीठांना UGCच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घ्यावा.