Home > News Update > राज्यात निर्बंध आणि रात्रीच्या संचारबंदीबाबत आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

राज्यात निर्बंध आणि रात्रीच्या संचारबंदीबाबत आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

राज्यात निर्बंध आणि रात्रीच्या संचारबंदीबाबत आरोग्यमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान
X

Photo courtesy : social media

राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील, त्यांच्याकडे वेगवेगळे प्रस्ताव येत असतात त्यामुळे निर्बंधाबाबत तेच निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे जे निर्बंध लावता येतील ते लावण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. रात्रीच्या संचारबंदीबाबतही मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असंही टोपे यांनी सांगितले आहे.

"राज्यात ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झालेली नाही, पण राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. 41 हजार रुग्ण काल सापडले आहेत. कालच्या पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एकही ओमायक्रॉन बाधित रुग्ण नाही" अशीही माहिती टोपे यांनी दिली. मात्र चिंता करण्याची गरज नाही, राज्य सरकारने केलेले नियम पाळून गर्दी टाळा ,तरच कोरोना नियंत्रित करता येईल असे आवाहनही त्यांनी केले.

हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांची सरकारला काळजी आहे, त्यामुळे विचारपूर्वक निर्बंधाबाबत निर्णय घेतले जातील असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ओमायक्रॉनचा पुढील प्रकार अत्यंत धोकादायक राहील असा इशारा केंब्रीजच्या प्राध्यापकांनी दिल आहे, मात्र यावर निष्कर्ष समोर येईपर्यंत बोलणं उचित होणार नाही,असही टोपे यांनी स्पष्ट केलं.

लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येत असेल तर लगेचच त्यांच्या चाचण्या करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिलीय. 10 जानेवारीपासून राज्यात 60वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. आधी नागरिकांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन यापैकी जी लस दिली असेल त्याच कंपनीचा बूस्टर डोस दिला जाईल अशी माहिती देखील टोपे यांनी दिली. पण सध्या कोविशिल्डचे 60 लाख डोस आणि कोव्हॅक्सीन 40 लाख लसी कमी पडत आहेत, या संदर्भात केंद्राकडे मागणी केली असून लवकरच या लसी राज्य सरकारला मिळतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. हायरिस्क देशांबरोबरच आता प्रत्येक देशातून राज्यात विमानातळावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 7 दिवस कवारंटाईन राहणं बंधनकारक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुंबईत ऑक्सिजन बेडवर असलेल्या 1 हजार 996 रुग्णांपैकीं 96 टक्के रुग्णांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही, पालिका आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. 96 टक्के लोकांनी लसीकरण न केल्यानेच ते बाधित झाल्याचे टोपे म्हणाले. त्यामुळे नागरिकांनी लसीच्या बाबतीत टाळाटाळ करू नये लसीकरण करून घ्यावे असं आवाहन त्यांनी केलं. ICMR च्या सूचनेप्रमाणे राज्यभरात सर्वांना केवळ 7 दिवस विलगीकरण करण्यात यावं अशी सूचना ठाण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्याना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

Updated : 8 Jan 2022 3:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top