Home > News Update > कंगना आणि अर्णबवर सूडबुद्धी; मग सरनाईकांवर काय?

कंगना आणि अर्णबवर सूडबुद्धी; मग सरनाईकांवर काय?

गेले दोन दिवस आक्रमक असलेल्या विरोधी पक्षाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख उत्तर देऊन आज विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी निरुत्तर केले.राज्याला मातीत घालणारं राजकारणात थांबवायला हवं अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला प्रत्युत्तर दिले.

कंगना आणि अर्णबवर सूडबुद्धी; मग सरनाईकांवर काय?
X

महाराष्ट्राच्या राजकारणात सूडबुद्धीला थारा दिला जात नाही आणि आम्ही देखील तसं राजकारण करत नाही पण याचा अर्थ असा नाही की कुणीही यावं आणि टपली मारून जावं, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

आज सकाळच्या सत्रात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्यावर झालेली हक्कभंगाची कारवाई ही सूडबुद्धीतून आहे. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही सूडबुद्धीतून काहीही करत नाही.

तुम्ही म्हणता त्यांच्यावरील हक्कभंगाची कारवाई ही सूडबुद्धीने झाली मग प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली ईडीची कारवाई कशातून झाली.

प्रताप सरनाईक, त्यांचा मुलगा सगळ्यांना ईडीने समन्स बजावले आहेत. त्यांना अजून नातू झाला नाही तर नातवाचा जन्म झाल्यावर थेट इकडेच चौकशीसाठी घेऊन या असं अजून कुणी म्हटलं नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभरातल्या कामाच्या पुस्तकाचे संदर्भ देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. त्या सगळ्याला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलं आहे. आज त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलही भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची लढाई अंतिम टप्प्यात पोहचली आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी वकिलांची फौज आली आहे. मराठा समाजाचं आरक्षण टिकेल हा विश्वास मला आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून आग लावण्याचा प्रयत्न करणार्‍यांच्या आगीवर आता पाणी टाकावे लागेल; आम्ही टाकलं नाही तरी जनता पाणी टाकणारच आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

करोनावरुन आमच्यावर टीका करत आहेत. मात्र राज्याने एकही आकडेवारी पहिल्या दिवसापासून लपवलेली नाही. विरोधकांनी आमच्यावर टीका जरुर करावी आम्हाला काहीही आक्षेप नाही. मात्र आपल्या धारावी मॉडेलचं कौतुक जगाने केलं आहे या गोष्टी विरोधकांना दिसत नाही का? डॉक्टरांची टास्क फोर्स निर्माण करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. तसंच माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजनाही महाराष्ट्रात योग्य पद्धतीने राबवण्यात आली. याचंही कौतुक झालं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या राजकारणात सक्रिय व्हावं असं मला वाटतं मला वाटतं की ही सुधीर मुनगंटीवार यांचीही हीच इच्छा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी हसत हसत म्हटलं. त्यावर नाना पटोले यांनी आमच्या मित्राच्या मागे का लागता असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्ही इथेच थांबा तुम्ही कुठे जाऊ नका. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

शेतकऱ्यांना देशद्रोही अतिरेकी ठरवणार ते आपल्या संस्कृतीत बसत नाही असंही मुख्यमंत्री कृषी विधेयकांवर बोलताना सांगितले.

कांजूरमार्ग जागेवरुन निर्माण झालेल्या वादावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रातील जागेवर पहिला अधिकार महाराष्ट्राचा आहे. कोर्टात आणि बाजू मांडू आणि जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

येत्या काही वर्षांमध्ये प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठीही काम करणार आहोत. यावरुन तुमच्या हे लक्षात येईल की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Updated : 15 Dec 2020 7:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top