Uddhav Thackeray : ऑपरेशनंतर मुख्यमंत्री एक्टिव्ह, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचे संकेत
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ अधिवेशनातील अनुपस्थितीमुळे त्यांच्या प्रकृतीविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात होते. पण आता या आजारपणानंतर मुख्यमंत्री एक्टिव्ह झाले आहेत. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांशी संवाद साधला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात नगरविकास खात्याची बैठक झाली, त्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. मुंबईकरांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुंबईकरांच्या आरोग्याची, सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, फक्त मुंबईकरांनी आपले आशीर्वाद सोबत असू द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राजकारणात काही केले की त्याची टीमकी वाजवायची असते, कारण काम केले की विरोधक भ्रष्टाचार केला असाच आरोप करतात, असा टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. "अनेक जण वाट्टेल ते सांगतात., आश्वासने देतात आम्ही तारे तोडून आणू, चंद्रावर उड्डाणपूल बांधू, अशा न होणाऱ्या गोष्टी सांगतात आणि लोक फसतात आणि मतं देऊन मोकळे होतात. पण ५ वर्ष काही बोलायचे नाही, मग पुढे तुम्ही तारे तोडून आणणार होतात असे विचारले की निवडणुकीत अशी आश्वासनं द्यायची असतात, असे सांगतात. पण मग मतदार त्यांना तारे दाखवतात" असा टोलाही त्यांनी लगावला.
पण त्याचवेळी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढू शकते, असे संकेत देखील त्यांनी दिले. सध्या शिवसेनेसोबत नवीन मित्र आहेत, यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत.आपण तिघे मिळून बरोबर जात आहोत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष सोबत लढू शकतात असे संकत दिले. विरोधक आश्वासनं देतात आणि विसरतात, पण निवडणुक जिंकण्यासाठी खोटी आश्वासनं शिवसेना कधीही देणार नाही, असे त्यांनी सांगितले.