अंबानी स्फोटक प्रकरणाच्या तपासावरुन केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष
X
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये निर्माण झालेला संघर्ष ताजा असताना आता पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणावरुन नवीन संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAकडे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. याबाबत सरकारतर्फे अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी NIA तपासाची मागणी केली होती. पण त्यानंतर ज्या गाडीत स्फोटकं सापडली होती त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने राज्य सरकारने हा तपास ATSकडे सोपवला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. आमचा एटीएसवर पूर्ण विश्वास आहे. पण जर तरीही तपास NIAकडे दिला जात असेल तर यामध्ये काही तरी काळंबेरं आहे असा याचा अर्थ होतो आणि यातील सत्य समोर येईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आम्ही सिल्वासाचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करीत आहोत. पण तो केंद्रशासित प्रदेश असल्याने विरोधकांना त्यावर बोलायचे नाहीये. त्यामुळेच महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था नाहीये असे दाखवण्याचा विरोधकांचा डाव आहे असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, एनआयएने या प्रकरणाचा तपास केला तरी मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि त्यांची गाडी बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास ATS सुरूच ठेवणार आहे.