वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनचा पर्याय दिसतोय पण....- मुख्यमंत्री
X
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा पर्याय दिसतो आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी धड़गाव व मोलगी परिसरातील ग्रामीण रुग्णालयांना भेटी देऊन तिथल्या नागरिकांशी चर्चा केली. तसेच कोरोनासंदर्भात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन काही सूचना देखील केल्या आहेत.
कोरोनाचा वाढता प्रभाव बघता लॉकडाऊन हाच पर्याय डोळ्यासमोर दिसत आहे. परंतू अजून देखील जनतेकडून मला सहकार्याची अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या निश्चितच चिंतेची बाब आहे, पण राज्याच्या जनतेने जशी आतापर्यंत साथ दिली तशी यापुढेही द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
आता जनता स्वयंस्फूर्तीने मास्क घालायला लागली आहे, नियम पाळत आहे, असेही त्यांनी म्हटले. केंद्रसरकारच्या नियमांप्रमाणे लसीकरण सुरू असून लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. लसीकरणा संदर्भात लोकांच्या मनात भीती आहे, ती भीती लोकांनी घालवावी आणि स्वयंस्फूर्तीने लस घ्यावी, तसेच मास्क घालावे, नियमित हात धुवावे व सोशल डिस्टन्सिग ठेवावे, असेही आवाहन त्यांनी केले.