मुख्यमंत्री महोदय, निदान हवाई पाहणी करा..
CM Uddhav thackeray atleast take an aerial survey of heavy rainfall area in Maharashtra
X
राज्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाचं संकट सुरू झाल्यापासून सर्व राज्यकारभार घरूनच सुरू केला. ऑनलाइनमुळे संपर्काच्या अनेक सुविधा उपलब्ध असल्या तरी ऑनलाइन माध्यमांतून तुम्हाला तेच कळतं जे प्रशासनाला तुम्हाला दाखवायचं आहे. जन्मजात किंवा अपघाताने आंधळेपण ज्यांच्या वाट्याला येतं ते पण परिस्थितीशी झुंज देऊन जगायला शिकतात, पण आंधळेपणाची भूमिका घेतलेल्यांना पोपट मेल्याचं कोण सांगणार? राजा जर आंधळा झाला तर त्याला संजय जे सांगतोय त्यावर विसंबून राहावं लागतं.
राज्यात परतीच्या पावसाने कहर केला आणि शेतकऱ्याचं, सामान्य माणसाचं अतोनात नुकसान झालं. हाताशी आलेलं पीक, कापणी करून ठेवलेलं पीक डोळ्यासमोरून वाहून जाताना पाहताना काळीज तुटत होतं. पावसाचा कहर येणार, नुकसान होणार याचे सर्व अंदाज हवामान खात्याने आधीच दिले होते. त्याप्रमाणे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी खबरदारीचे उपाय योजना ही करण्याचा प्रयत्न केला, पण निसर्गाच्या शक्तीपुढे ते सर्व तोकडं पडलं. जाता जाता पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलं. अशा वेळी राज्याच्या सरकारने दिलासा दिला पाहिजे अशी शेतकऱ्यांची भावना आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडून त्यांच्या अपेक्षा आहेत, पण खेदाची बाब म्हणजे उध्दव ठाकरे अजून तटबंदीतून बाहेर पडायला तयार नाहीत. कोरोना सुरू झाल्यापासून त्यांनी फक्त पंढरपूर आणि पुणे असाच दौरा आतापर्यंत केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बाहेर पडून लोकांशी संपर्क करू लागले, आढावा घेऊ लागले त्यानंतर उध्दव ठाकरे पहिल्यांदा बाहेर पडले, मुंबईत त्यांनी कोविड रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या विशेष रूग्णालयांना भेटी दिल्या.
दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी राज्यातील सर्वच जिल्ह्यांना, कोविड रूग्णालयांना भेटी दिल्या. लोकांशी संवाद साधला. उध्दव ठाकरे यांच्या तब्येतीमुळे त्यांना हे शक्य झाले नसावे असं एक वेळ मानलं तर मग छोटे ठाकरे का नाही फिरले हा ही मोठा प्रश्न आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या काही भागांमध्ये भेटी दिल्या,
पण कालच सर्वोच्च न्यायलयाने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र किती मोठा आहे हे जाणून घेतलं पाहिजे. केवळ मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही.
ठाकरे परिवाराला आता कोंदणातून बाहेर पडावं लागेल. कोरोनाचा धोका जरूर आहे, पण प्रशासनावर ताबा मिळवायचा असेल तर लोकांची दुःख प्रत्यक्ष ऐकली पाहिजेत. राज्याला आभासी मुख्यमंत्र्यांची गरज नाही. मुख्यमंत्री आमचाच, आणि ठाकरे परिवारातीलच असायला हवा या हट्टाची पूर्ती आता झाली आहे. आता राज्य चालवलं पाहिजे. यात कसूर झाली तर जनता तुम्हाला माफ करणार नाही.
जनतेची दुःख तुम्हाला ऑनलाइन कळणार नाहीत. व्हिडीयो कॉन्फरन्स करण्याएवजी तुम्ही राज्याचा हवाई दौरा करा, पण आता घरातून बाहेर पडा.