औरंगाबाद जिल्ह्याचा नामांतराचा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत: उद्धव ठाकरे
X
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याचे अधिकार केंद्राच्या अखत्यारीत असून, राज्याकडून आवश्यक मान्यता प्राप्त करून नामांतराचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात येईल असा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
तारांकित प्रश्नाच्या वेळी चारकोपचे आमदार योगेश कासार यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतरावरून प्रश्न उपस्थित केला.याला उत्तर देताना मुख्यमंत्री आणि विधी व न्याय मंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्याकडून 4 मार्च 2020 रोजी सरकारला सादर करण्यात आला आहे.
तसेच गाव शहराचे नाव बदलण्याचा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत असून राज्य शासनाला तसे अधिकार नाही. त्यामुळे या प्रकरणात विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्यात येत असून त्यांचे अभिप्राय तसेच इतर आवश्यक मान्यता प्राप्त होताच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येईल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.