बंद दाराआड चर्चेवरील अमित शाहांच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांचे उत्तर
X
शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेल्य बंद दाराआडच्या चर्चेचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या चौफेर टीकेला दमदार उत्तर दिले. कोरोना काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले. मी खोटे बोलत नाही आणि खोटी आश्वासनं देत मग ती बंद दाराआड का असेना असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख निर्लज्ज असा केला. असंसदीय शब्द असला तरी मी वापरेन असे सांगत त्यांनी विधानसभेत जोरदार टीका केली. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत अमित शाह यांनी आपल्याला शब्द दिला होता पण बाहेर आल्यानंतर तो शब्द त्यांनी फिरवला असा आरोप पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केला. बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यायचे त्यांच्याच खोलीत दिलेला शब्द पाळायचा नाही हे कसले हिंदुत्व असा सवालही त्यांनी विचारला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचे आश्वासन दिले होते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. पण त्यानंतर वर्षभराने अमित शाह यांनी मी बंद दाराआडचे राजकारण करत नाही असे म्हणत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली होती. त्यावर मात्र उद्धव ठाकरे यांनी आता पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.