नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच एक्टीव्ह झाले आहेत. त्यातच पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
X
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना दिले.
मुख्यमंत्र्यांनी वाहतूक कोंडी टाळण्याच्या उपाययोजनेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाहतुकीचे नियोजन करताना जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावे. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक योग्यरितीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्यादृष्टीने आवश्यक कामे युद्धपातळीवर करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर जात असताना पुण्यातील चांदणी चौक परिसरात वाहतूकीची समस्या नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत या भागाला भेट देऊन अधिकाऱ्यांनी तातडीने कामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर सातारा दौऱ्यावरून मुंबईकडे परतत असताना प्रशासनाने केलेल्या कामाच्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागाला भेट दिली. त्यावेळी प्रशासनाने केलेल्या कामाची माहिती घेतली. तसेच नागरिकांना होणारा त्रास लवकरच दूर करण्यासाठी यंत्रणा राबवली जाईल, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.